मराठी वृत्तपत्रात हर्षवर्धन जाधव यांची जाहिरात; माझा राजीनामा मंजूर करा

harshawardhan-jadhav
औरंगाबाद : मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची जाहिरात औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठी वृत्तपत्रात दिली आहे. ही राजीनाम्याची जाहिरात मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना उद्देशून असून ही जाहिरात शिवराज्य बहुजन पक्ष या आपल्या पक्षाच्या बॅनरखाली देण्यात आली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. त्यांनी त्यानंतर २५ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे आपला राजीनामा पाठवला. मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबत अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आंदोलन नको आता १ डिसेंबरला जल्लोष करा, असे म्हटले होते. हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या या विधानावरही आक्षेप नोंदवला आहे. फक्त राजकीय टायमिंग साधण्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा वेठीस धरत असल्याचेही वृत्तपत्राच्या जाहिरातीत म्हटले आहे.

याबाबत हर्षवर्धन जाधव म्हणतात की, स्वत:ची पाठ मराठा आरक्षणाबाबत थोपटून घेऊ नका. तुमच्या हातात मराठा समाजाला न्याय देण्याचे कर्तव्य होते, तुम्ही त्यात दिरंगाई केली. त्यामुळे बरीच कोवळी मुले आत्महत्येकडे वळली. या कारणांमुळे मी माझा राजीनामा कायम ठेवत आहे. धनगर आणि मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा शब्दही तुम्ही पाळला नाहीत. त्यामुळे तुमच्या विधानसभेच्या जंत्रीमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे माझा राजीनामा त्वरित मंजूर करावा अशी जाहीर विनंती करतो.

Leave a Comment