मुंबई : किमान दोन 5G फ्लॅगशिप फोन पुढच्या वर्षी येतील, अशी अपेक्षा दूरसंचार उपकरण कंपनी क्वालकॉमचे अध्यक्ष ख्रिश्चियानो अॅमन यांनी व्यक्त केली असून वनप्लसचे कार्ल पेई यांनी त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच तातडीने घोषणा केली की पुढच्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये वनप्लसचा 5G फोन बाजारात येईल.
पुढील वर्षी जगातील पहिला 5G फोन आणणार वनप्लस !
आता जग इंटरनेटच्या पाचव्या पिढीसाठी सज्ज झाले असून यादृष्टीने भारतानेही महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यासाठी सरकारी पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरु असून जगभरातील इतर देशांसोबतच भारतामध्येही पाचव्या पिढीचे हायस्पीड इंटरनेट वापरायला मिळावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
वनप्लसचा जो पाचव्या पिढीच्या इंटरनेटला सपोर्ट करणारा फोन येईल तो स्नॅपड्रॅगनच्या X50 या मॉडेमवर आधारित असेल, असेही कार्ल पेई यांनी कॉन्फरन्समध्ये जाहीर केले. आपण लवकरात लवकर 5G फोन आणणार असल्याचे अनेक कंपन्यांनी जाहीर केले आहे. असुस, एचएमडी ग्लोबल (नोकिया फोन बनवणारी कंपनी), एलजी, मोटोरोला, ओप्पो, व्हीवो, शाओमी, सोनी या कंपन्यांनी क्वालकॉमला आश्वासन दिले आहे की 5G साठी आम्हीही प्रयत्नशील असल्यामुळे आता पाचव्या पिढीच्या फोनसाठी जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या यादीत सॅमसंग आणि अॅपल यांसारख्या कंपन्यांची नावे नाहीत. कारण, यांचे स्वतःचे निर्मिती तंत्र आहे. पाचव्या पिढीच्या फोनसाठी अॅपलही प्रयत्नशील असेल. पण कंपनीच्या सध्याच्या दोन चिपमेकर कंपन्यांसोबत असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर यासाठी वेळ लागू शकतो, असे म्हटले जात आहे.