मेहूल चोक्सीकडून जेटलींच्या मुलीने आणि जावयाने घेतले पैसे – काँग्रेस

arun-jaitley
नवी दिल्ली – भाजपचे कर्ज बुडवून देशाला हजारो कोटींचा चुना लावणा-या पळपुट्या उद्योजकांसोबत लागेबांधे असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून अर्थमंत्री अरुण जेटलींची मुलगी आणि जावयाचे पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याच्या गीतांजली जेम्स या कंपनीसोबत आर्थिक संबंध असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच याप्रकरणी अरुण जेटलींच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.

पत्रकार परिषद घेऊन मोदी आणि जेटलींवर काँग्रेस नेते सचिन पायलट, राजीव सातव व सुष्मिता देव यांनी निशाणा साधला. २३ घोटाळेबाजांनी मोदी सरकारच्या ४४ महिन्यांच्या कार्यकाळात देशाला ५३ हजार कोटी रुपयांचा चुना लावला. ढासळती अर्थव्यवस्था, बँकांचे घोटाळे आणि कर्जबुडवे उद्योजक हेच भाजपच्या नव्या भारताचे चित्र आहे. या उद्योजकांना परदेशात पळून जायला जेटलींनीच मदत केल्याचा आरोप करत त्यांनी अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी केली.

पीएनबी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यासंबंधी अनेक नवे खुलासे काँग्रेस मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पायलट यांनी सादर केले. त्यांनी यावेळी अरुण जेटली, त्यांची मुलगी सोनाली जेटली आणि जावई जयेश यांच्यावर आरोप लावताना म्हटले की, जेटली असोसिएट्सने डिसेंबर २०१७ मध्ये मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्स लिमिटेडकडून रिटेनरशिपसाठी २४ लाख रुपये घेतले होते. यावर स्पष्टीकरण देताना जेटलींच्या जावयाने रिटेनरशिप घेताना सदरील कंपनी घोटाळ्यात सहभागी असल्याची मला कल्पना नव्हती. याची माहिती कळल्यावर आम्ही तत्काळ ती रक्कम चोक्सी यांना परत केल्याचे म्हटले आहे.

हा सरळसरळ आर्थिक हितसंबंध, भ्रष्टाचाराचा प्रकार असताना त्यांना वाचवले जात असल्याचे पायलट म्हणाले. पंतप्रधान कार्यालयाकडून २०१६ मध्ये सर्व तक्रारी अर्थमंत्र्यांकडे पाठवल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. नीरव मोदी १ जानेवारी २०१८ ला तर, मेहुल चोक्सीने ४ जानेवारीला भारत सोडल्यानंतर ३१ जानेवारीला सीबीआयने मेहुल आणि अन्य लोकांवर एफआयआर दाखल केली होती. पण या प्रकरणाशी थेट संबंध असलेल्या सोनाली जेटली आणि त्यांचे पती जयेश यांना साधे चौकशीसाठी का बोलावण्यात आले नाही, असा सवालही पायलट यांनी यावेळी उपस्थित केला.

सामान्य माणसापेक्षा भ्रष्ट उद्योगपतींप्रती नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची निष्ठा जास्त असल्यामुळे त्यांनी बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या या लोकांना फक्त देशातून पलायन करण्यास मदत तर केलीच त्याचबरोबर त्यांना कायद्याचे संरक्षण पुरवण्यासाठी सुद्धा भाजपने काहीच कसर ठेवली नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Leave a Comment