आगामी काळात रोबोट अशी कामे करणार की तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल

robot
कोतो – सध्याच्या डिजिटल युगात मानव विलक्षण प्रगती करत असून मानवाने निर्मित केलेले रोबोट तसे बघितले तर एक यंत्रच आहे. पण येणाऱ्या काळात हेच रोबोट अशी काही कामे करू शकणार आहेत जे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल यात शंकाच नाही.

लोकांना याची प्रचिती जपानमध्ये आयोजित वर्ल्ड रोबोट परिषदेत आली आहे. एक्सोस्केलेटन ‘मसल्स सूट’ आणि लोड लिफ्टिंग रोबोट (अवजड सामान वाहून नेऊ शकणारे यंत्र मानव) यांचे प्रदर्शन या परिषदेत भरवण्यात आले होते. या परिषदेतील हे रोबोट बघून येणाऱ्या काळात शारीरिक कष्ट जास्त कराव्या लागणाऱ्या कामांसाठी या रोबोट्सचा वापर करता येऊ शकणार आहे. कदाचित ते येणाऱ्या काळात प्रत्यक्षात मजुरांची जागा घेऊ शकतील, असे या प्रदर्शनावरुन स्पष्ट होत आहे.

तुम्हाला ह्यूमनॉयड रोबोट या प्रदर्शनात बघायला मिळू शकतात. याची निर्मिती टोकियोतील इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड इंडस्ट्रिअल सायन्स अँड टेक्नालॉजी ( एआयएसटी) या कंपनीने केली असून अतिशय शारीरिक श्रमाची गरज असलेल्या कामांसाठी एचआरपी-५पी रोबोटचा वापर करता येऊ शकतो. उल्लेखनीय म्हणजे हे स्वयंचलित आहेत. भोवतालच्या परिसराचे 3डी मॅप हा रोबोट बनवून मग त्याच्या कामाला सुरुवात करतो. त्यामुळे सामान नेताना समोर येणारे अडथळे तो टाळू शकतो. कमी प्रकाशातही हा रोबोट आपले काम चोखपणे बजावू शकतो.

या प्रदर्शनात मॅन मशीन सिनर्जी इफेक्टर्स इंक या कंपनीनेही आपले रोबोट ठेवलेले आहेत. एमएमएसई बॅटरॉईड, असे नाव याला देण्यात आले आहे. मानव या रोबोटला नियंत्रित करतो. त्यासाठी एक खास हेडगिअर मानवला परिधान करावे लागते. अशाच प्रकारे अन्य रोबोटही या प्रदर्शनात आहेत. ज्यांना मानवद्वारे काही खास यंत्राच्या सहाय्याने नियंत्रित करण्यात येते.

Leave a Comment