एकनाथ खडसेंवर सोपवली जाऊ शकते भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी

eknath-khadse
जळगाव – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. मंत्रिमंडळ विस्तार विजयादशमीच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. पण माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना या विस्तारात पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यायचे, की भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवायची यावर पक्षश्रेष्ठींचा विचारविनिमय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळात एकनाथ खडसे यांना स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही हिरवा कंदील न दाखवल्यामुळे खडसेंना विस्तारात थेट प्रदेशाध्यक्षपदाचीच जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींशी या दृष्टीने चर्चा करून काही ठोस मार्ग काढण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशेषत: हा बदल आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षीयपातळीवर करण्याचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते.

खडसे यांनी जळगावमध्ये भाजपच्या मेळाव्यात बोलताना आपण मंत्रिमंडळात जाण्यास उत्सुक नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. पण त्यांनी एकीकडे मंत्रिपद स्विकारण्यास अनुत्सुकता दर्शवली असली, तरी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री जळगावात असताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खडसे सोबत होते. त्यामुळे खडसेंना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार याबद्दल उत्सुकता आहे.

सूत्रांनुसार, मुख्यमंत्री फडणवीसांचा खडसे यांच्या मंत्रिमंडळातील वापसीला होकार नाही. तथापि, खडसे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवून त्यांची नाराजी दूर करण्यावर त्यांचा भर आहे. शिवाय, प्रदेशाध्यक्षपद खडसेंकडे दिले जाणार असल्याबाबत जोरदार चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला काही आमदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला.

मंगळवारी सायंकाळी भाजप अध्यक्ष अमित शहा अचानक मुंबईत दाखल झाले होते. शहा यांची नियोजित मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुंबई भेट महत्त्वाची मानली जात आहे. शहा यांनी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन विस्ताराबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ खडसेंवर आरोप आहेत. शिवाय आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून युती करण्याची तयारी असल्यास त्यांना विस्तारात अधिक स्थान द्यावे लागेल, त्यामुळे भाजपला कमी खात्यांवर समाधान मानावे लागणार आहे. दुसरीकडे, सध्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे मराठा असले तरी बहुजन, ओबीसी समाज एकनाथ खडसेंच्या मागे आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाली व शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले, तर खडसेंचे वक्तृत्व व नेतृत्वाचा उपयोग पक्षाला होऊ शकतो, या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी खडसेंना प्रदेशाध्यक्ष पद देण्याची तयारी दर्शवली आहे.

Leave a Comment