‘#Metoo’च्या भीतीमुळेच महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल : शिवसेना आमदार

sanjay-shirsat
औरंगाबाद – सुशिक्षित महिलांसाठी ‘#Metoo’ मोहीम ही एक हत्यार ठरत असून महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण या मोहीमेमुळे कमी होईल, असे सांगत ‘#Metoo’ मोहीमेवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली. पाच वर्षानंतर एखादी महिला तक्रार करेल या भीतीनेच महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.

राज्य महिला आयोग आणि समाजसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयक कायदे यावर कार्यशाळेचे आयोजन औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात करण्यात आले होते. शिवसेना आमदार संजय शिरसाट या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आमदार संजय शिरसाट ‘#Metoo’ मोहीमेबाबत म्हणाले, मला ‘#Metoo’ चा अर्थ कळालेला नसून ‘#Metoo’ची आता मलाच भीती वाटते. ते स्वतः ला सुशिक्षित म्हणवणाऱ्या महिलांसाठी एक हत्यार ठरु लागले आहे.

ग्रामीण भागातही महिलांचे शोषण होते. पण ‘#Metoo’ बद्दल त्यांना माहिती नसते. अशा मोहीमांमुळे सक्षमीकरण होत नाही. याऊलट महिलांना नोकरी देण्याचे प्रमाण कमी होईल, असे शिरसाट यांनी सांगितले. मुलांना सांभाळणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आणि संसाराचा गाडा सुरळीत ठेवणे ही महिलांची जबाबदारी आहे. पण आता कोणती महिला काय आरोप करु शकेल याचा अंदाज बांधता येत नाही. साडी दिली नाही म्हणून विवाहित महिला पतीविरोधातही ‘#Metoo’ म्हणणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुरुषांसाठी विमा योजनेत विमा दिला जातो. पुरुषाला यात काही झाल्यास महिलेला भरपाई मिळते. पण पुरुषांना पत्नीचे निधन झाल्यावर काय मिळते, असा सवाल त्यांनी विचारला. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला संघटनांच्या प्रतिनिधिंनी आपल्या भाषणातूनच प्रत्यूत्तर दिले.

Leave a Comment