गुगलची डुडलद्वारे तबलावादक ‘पंडित लच्छू महाराज’ यांना आदरांजली

google
मुंबई – गुगलने आज डुडलद्वारे बनारस घराण्याचे तबलावादक ‘पंडित लच्छू महाराज’ यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. बॉलीवुडचे आवडते तबलावादक म्हणून १६ ऑक्टोबर १९४४ ला जन्मलेल्या लच्छू महाराजांचा लौकिक होता. ‘लक्ष्मण नारायण सिंह’ असे त्यांचे नाव होते. पण ‘लच्छू महाराज’ याच नावाने त्यांना ओळखले जाते.

लच्छू महाराजांनी वडिलांच्या प्रेरणेने लहान वयातच संगीत साधना सुरू केली. त्यांचे वडील हेच त्यांचे पहिले गुरु. बनारस घराण्यातील तबल्याचा लौकिक अनेक पिढ्यांचा होताच. त्या लौकिकाला साजेसा कलावंत लच्छू महाराजांनी स्वतःच्यात जपला. त्यांनी केंद्र सरकारचा ‘पद्मश्री’ हा किताब जातिवंत कलावंताला रसिकांनी टाळ्या वाजवून दिलेली दाद हाच खरा पुरस्कार असतो, असे सांगून नाकारला. बारा भावंडांपैकी एक असणाऱ्या लच्छू महाराजांनी आपल्या घराण्याची कीर्ती वाढविली.

लच्छू महाराजांनी अखेरच्या दिवसांतही तब्येत ठीक नसतानाही संगीताच्या साधनेत खंड पडू दिला नाही. त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविणेही सुरूच ठेवले. कोणत्याही गोष्टीचा हव्यास न धरता साधेपणाने जीवन जगत राहिले. त्यांनी तबल्याची साथ धरली आणि तबल्यानेही त्यांना शेवटपर्यंत साथ दिली, हीच त्यांच्या महानतेची खूण आहे. २८ जुलै २०१६मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने वाराणसी येथे ७३व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Leave a Comment