सोमवारपासून डेक्कन क्वीन व पंचवटी एक्स्प्रेसमध्ये फिरते ग्रंथालय!

deccan-queen
पुणे – १५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी संपूर्ण राज्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ‘लायब्ररी ऑन व्हील्स’- फिरते ग्रंथालय रेल्वे गाडय़ांमध्ये सुरू करण्यात येत असून, डेक्कन क्वीन व पंचवटी एक्स्प्रेस या दोन गाडय़ांमध्ये रेल्वेच्या सहकार्याने येत्या १५ ऑक्टोबरपासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आता प्रवासातच या गाडय़ांतील प्रवाशांना वाचनाचा आनंद मिळेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

सोमवारी मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे- मुंबई- पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड- मुंबई- मनमाड) या दोन गाडय़ांमधील फिरत्या ग्रंथालयाचे उद्घाटन होणार आहे. मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवाशांना या दोन्ही रेल्वे गाडय़ांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये विनाशुल्क वाचनसेवा देण्यास सुरुवात करणार आहेत. या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तावडे यांनी प्रवाशांना केले आहे.

‘वाचनध्यास’ या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पुस्तकांच्या गावी सातारा जिल्ह्य़ातील भिलार येथेही आयोजन करण्यात आले आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर आज व उद्या १४ ऑक्टोबर या दोन दिवसांत ७५ वाचक, आपल्या आवडत्या पुस्तक-घरात एकूण १२ तास पुस्तक-वाचन करणार आहेत.

Leave a Comment