व्यक्तिगत आयुष्यामध्ये असे होते शहिद भगतसिंह

bhagat-singh
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी देशासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या शहिद भगत सिंहांचे नाव भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासामध्ये मानाने घेतले जाते. भारताचे स्वातंत्र्य हे एकमेव ध्येय असणाऱ्या भगतसिंहांचे संपूर्ण आयुष्यच देशसेवेला वाहिलेले होते. अश्या या असामान्य स्वातंत्र्य सैनिकाच्या व्यक्तीगात आवडीनिवडींच्या बद्दल जाणून घेऊ या.
bhagat-singh1
भगतसिंह यांना चार्ली चॅप्लीन यांचे चित्रपट अतिशय आवडत असत. जेव्हा सवड आणि संधी मिळेल त्यावेळी चार्ली चॅप्लिन यांचे चित्रपट भगतसिंह पहात असत. भगत सिंह जात्याच खवय्ये होते. रसगुल्ले ही त्यांची खास आवडती मिठाई असे. आपल्या आवडत्या मिठाईवर आपल्या मित्रमंडळींच्या सोबत ताव मारणे त्यांना मनापासून आवडत असे. भगत सिंह यांना ‘लॉंग शूज’ परिधान करणे विशेष पसंत असे. ते परिधान करीत असलेले ‘लॉंग शूज’ आजही अमृतसर येथील वस्तूसंग्रहालयामध्ये ठेवलेले आहेत. भगत सिंह हे जात्याच आनंदी स्वभावाचे असून, त्यांच्या आवडीनिवडी देखील त्यांच्या इतर तरुण मित्र मंडळींप्रमाणेच होत्या.
bhagat-singh2
भगत सिंह यांना लहानपणापासूनच वाचनाची अतिशय आवड होती. जगभरातील मोठमोठ्या विचारवंतांची पुस्तके वाचण्याचा त्यांना नाद होता. ते लहान असताना त्याच्या आई-वडिलांनी त्यांची कुंडली ज्योतिषाला दाखवून मुलाचे भविष्य कसे असेल अशी विचारणा केली असता, हा मुलगा पुढे जाऊन मोठे नाव कमावेल आणि त्याच्या हातून देशसेवा घडेल अशी भविष्यवाणी ज्योतिषाने केली होती. केवळ भगत सिंहच नव्हे, तर त्यांच्या परिवारातील इतर अनेक सदस्य देखील स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सक्रीय होते.

Leave a Comment