शरीरातील चरबी कमी करण्यास काळ्या मिऱ्यांचा चहा उपयुक्त

black-pepper
काळे मिरे हे सर्वसाधारणपणे प्रत्येक घरातील स्वयंपाकघरामध्ये हमखास सापडतोच असा मसाल्याचा पदार्थ आहे. सूप्स, भाज्या, काही खास ग्रेव्हीज्, रायते, कोशिंबिरी इत्यादी पदार्थांमध्ये काळ्या मिऱ्याची पूड वापरण्यात येत असते. पुलाव किंवा तत्सम पदार्थ बनविताना त्यामध्ये काळ्या मिरीचा वापर इतर अख्ख्या मसाल्यांच्या जोडीने केला जात असतो. काळे मिरे हे केवळ पदार्थाला वेगळी चव देण्यापुरतेच नाही, तर यामध्ये अनेक क्षार आणि अँटी ऑक्सिडंटस् आहेत. काळ्या मिऱ्याच्या वापरामुळे शरीरामध्ये आलेली सूज कमी होऊन, सर्दी खोकल्यामध्ये देखील आराम देणारा असा हा मसाल्याचा पदार्थ आहे. काळे मिरे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास सहायक आहेतच, त्याशिवाय वजन घटविण्यासही सहायक आहेत.
black-pepper1
काळे मिरे जर योग्य पद्धतीने आणि योग्य मात्रेमध्ये घेतले गेले तर त्यामुळे शरीराची चयापचय शक्ती वाढून वजन घटण्यास मदत होते. या बहुगुणी मसाल्याचा उपयोग करून घेण्यासाठी थोडे काळे मिरे आपल्या सकाळच्या चहामध्ये, चहा उकळत असताना घालून त्याचे सेवन करावे. आपल्या शरीराची चयापचय शक्ती यामुळे वाढण्यास मदत होते. तसेच हा चहा जर विना साखरेचा आणि कमी दुधाचा घेतला, तर ते एक उत्तम लो कॅलरी ड्रिंक ठरू शकते. हा चहा बनविण्यासाठी, चहा उकळत असताना त्यामध्ये अर्धा लहान चमचा काळ्या मिऱ्याची पूड घालावी. काळ्या मिऱ्याशिवाय, आले, तुळस, दालचिनी इत्यादी घालून केलेला चहा देखील आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचा आहे.
black-pepper2
काळ्या मिऱ्यामध्ये पाईपरीन नामक तत्व असते. या तत्वामुळे शरीराचे पचनतंत्र सुधारते. तसेच शरीरामध्ये चरबी साठून राहण्याचे प्रमाणही कमी होते, त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवण्यास काळ्या मिरीचे सेवन सहायक आहे. काळ्या मिऱ्याच्या सेवनामुळे आपल्या अन्नातून आपल्या शरीराला मिळणारी इतर पोषक तत्वे शरीरामध्ये सहजी अवशोषित होतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. काळ्या मिरीचा चहा किंवा काढाही अतिशय लाभकारी आहे. हा काढा बनविण्यासाठी एक कप गरम पाण्यामध्ये लहान अर्धा चमचा काळ्या मिरीची पूड, एक लहान चमचा लिंबाचा रस, आणि थोडे आले घालून हा चहा मुरवत ठेवावा. साधारण तीन ते चार मिनिटे हा चहा मुरल्यावर त्याचे सेवन करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment