काही देशांमध्ये झाले अश्याही कारणाकरिता संप !

strike
एखाद्या धोरणाच्या विरोधामध्ये असहकार पुकारून संप करणे हे सामान्य माणसाची, त्या धोरणाच्या प्रती असलेला विरोध किंवा निषेध दर्शविण्याची पद्धत, जगामध्ये बहुतेक सर्वच देशांमध्ये रूढ आहे. आपले मत संबंधित नेत्यांच्या किंवा पुढाऱ्यांच्या समोर मांडणे हे संपाचे उद्दिष्ट असते. अश्या प्रकारच्या असहकार आंदोलनांनी काही ठिकाणी मोठे सामाजिक परिवर्तनही घडवून आणले आहे. इतिहासकारांच्या मते अश्या प्रकारच्या संपांना किंवा असहकार आंदोलनांना सुरुवात सर्वप्रथम तेराव्या शतकाच्या आसपास झाली. पण सर्वच संपांचे उद्दिष्ट समाजकल्याणकारी कामांसाठी असेलच असे नाही. आजवर अनेक देशांमध्ये असे अनेक संप झाले ज्यांच्यामागे असलेली कारणे अजबच म्हणावी लागतील.

बटाट्याचे वेफर्स खरेदी केले, की ते पॅकेट आकाराने जरी मोठे दिसत असले, तरी त्याच्या आत मात्र वेफर्स कमी आणि हवाच जास्त, हा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. वेफर्सच्या पॅकेटस् मधील ही हवा म्हणजे नायट्रोजन वायू असतो. या पॅकेटस् मध्ये वेफर्स कमी आणि हवा जास्त असल्याचा निषेध म्हणून २०१४ साली दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांनी, १६० न उघडलेल्या वेफर्सच्या पाकिटांचा तराफा तयार केला, आणि हान नदीवर दोन विद्यार्थांनी हा तराफा चालविला. ही पॅकेट्स पाण्यावर तरंगू शकतील इतकी हवा त्यामध्ये असते हे दाखवून देण्यासाठी हा अजब संप पुकारण्यात आला होता. निषेध नोंदविण्याची ही अजब पद्धत पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली असतानाच, सुमारे दीड किलोमीटर अंतर या विद्यार्थ्यांनी या तराफ्यामध्ये बसून पार केले. त्यांच्या या निषेधाची नोंद घेऊन ‘ओरायन’ या वेफर्स बनविणाऱ्या कोरियन कंपनीने पॅकेट्समध्ये वेफर्सचे प्रमाण वाढविण्याची हमी दिली.

१९४७ साली कॅनडा देशामध्ये झालेल्या संपाचा उल्लेख इतिहासामध्ये ‘कॅन्डी बार स्ट्राईक’ म्हणून केला जातो. चॉकोलेटच्या किंमती वाढल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला होता. या निमित्त आयोजित केल्या गेलेल्या मोर्चामध्ये दोनशे मुले सहभागी झाली होती. या मुलांनी कॅपिटोल बिल्डींगच्या बाहेर धरणे धरून, कॅनडा सरकारचे काम एक दिवसाकरिता बंद पाडले होते. हळू हळू हे निषेधांचे लोण सर्व देशामध्ये पसरले आणि चॉकोलेटचे दर कमी होईपर्यंत चॉकोलेट न खाण्याचा निर्णय बालचमूने घेतला. अखेर सरकारला देखील या लहानग्यांपुढे मान झुकवावीच लागली, आणि काहीच दिवसांमध्ये चॉकोलेटचे दर ऐंशी टक्क्यांनी कमी झाले.
strike3
१९७३ साली स्कायलॅब स्पेस स्टेशनवरील अंतराळवीरांनी एक दिवसीय संप केला. हे तीन अंतराळवीर त्या स्पेस स्टेशनमध्ये ८४ दिवस असून, त्या दरम्यान त्यांना नासातर्फे सतत नवनव्या मिशन्स मिळत असल्याने या अंतराळवीरांना विश्रांती अशी मिळतच नसे. कामाच्या या सततच्या तणावाला कंटाळून जाऊन या अंतराळवीरांनी एक दिवसासाठी सर्व संपर्कयंत्रणा बंद करून टाकली आणि एक दिवसाचा संप पुकारून विश्रांती घेतली. तो दिवस या मंडळींनी अंतराळातील आपल्या अवकाशयानामधून केवळ पृथ्वीचे अवलोकन करण्याचा आनंद घेत घालविला. या दिवसाला नासाच्या इतिहासामध्ये ‘द डे ऑफ सायलेन्स’ म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment