युरोपीय देशांमध्ये याही कारणांस्तव होऊ शकते अटक!

arrest
युरोपची भ्रमंती करण्याचा अनुभव कोणाला नकोसा असेल? निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे देश, अनेक सुंदर पर्यटनस्थळे, तेथील विविध संस्कृती, चाली रीती यामुळे युरोपीय देशांमध्ये भ्रमंती करण्यासाठी पर्यटक प्राधान्य देताना दिसू लागले आहेत. मात्र या ठिकाणी कायदाव्यवस्था आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेल्या कायदा व्यवस्थेच्या मानाने निराळी आहे. किंबहुना या देशांमध्ये असेही काही विचित्र नियम आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास अटक देखील होऊ शकते.
arrest1
पाशाच्त्य देशांमध्ये सुका कचरा ‘री-सायकल’ केला जातो. त्यासाठी प्रत्येकाच्या घराच्या आसपास या ‘री-सायकलिंग बिन्स’ ठेवलेल्या आढळतात. ज्या वस्तू री-सायकल होणाऱ्या असतील, त्या वस्तू या बिन्समध्ये टाकल्या जातात. मात्र स्वित्झर्लंडमध्ये रविवारच्या दिवशी री-सायकलिंग बिनमध्ये कचरा टाकणे कायद्याने मना आहे. जर कोणी रविवारच्या दिवशी कचरा री सायकलिंग बिन मध्ये टाकताना आढळलाच, तर त्या व्यक्तीला भरघोस दंड तरी भरावा लागतो, नाही तर दोन दिवसांसाठी चक्क तुरुंगाची हवा खावी लागते.
arrest2
रविवारचा दिवस हा जर्मनीमध्ये केवळ आराम करण्याकरिता राखून ठेवला आहे, त्यामुळे या दिवशी घरामध्ये काही दुरुस्तीची कामे काढण्याच्या निमिताने ड्रिलिंग मशीनचा वापर करणे मना आहे. रविवारी जर्मनीतील बहुतेक दुकाने देखील बंद रहात असल्याने घरीच आराम करण्याशिवाय पर्याय असत नाही. आजकाल पायामध्ये ‘फ्लिप-फ्लॉप्स’, किंवा सामान्य भाषेमध्ये ज्याला आपण स्लिपर्स म्हणतो, त्या घालण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे आजकाल बाजारामध्ये नवनवीन फॅशनच्या फ्लिप फ्लॉप पाहायला मिळतात. मात्र स्पेनमध्ये गाडी चालविताना या फ्लिप फ्लॉप घालणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच हाय हील्स घालून, किंवा कोणत्याही प्रकारची पादत्राणे न घालता गाडी चालविणे देखील येथे मना आहे.
arrest3
स्कॉटलंड मधील लहान गावांमध्ये हिरव्या गार कुरणांवर चरणाऱ्या गायी पाहायला मिळतात. पण या गायी चरायला आणणाऱ्या व्यक्तीला गायी चरवत असताना मद्यपान करण्यास मनाई आहे. जर एखादी व्यक्ती मद्याच्या धुंदीमध्ये आढळलीच तर त्या व्यक्तीला दोनशे पौंडांचा दंड भरावा लागतो. याशिवाय ५१ आठवड्यांची कैदही या व्यक्तीस होऊ शकते. तसेच ब्रिटनमध्ये रांगेचे महत्व मोठे आहे. सिनेमाची तिकिटे विकत घ्यायची असोत, किंवा ट्रेनमध्ये चढायचे असो, रांगेची शिस्त येथे हवीच. त्यामुळे येथे रांग तोडणे मना आहे.
arrest4
व्हेनिस येथे कबुतरांना दाणे खाऊ घालणे बेकायदेशीर आहे. कबुतरांचा सुळसुळाट वाढल्याने स्थानिक प्रशासनाने २००८ सालपासून सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे चारण्यास मनाई केली आहे. जर कोणी कबुतरांना दाणे चारताना आढळले, तर त्यांना ७०० डॉलर्स दंड भरावा लागतो. ग्रीस मध्ये सार्वजनिक, प्राचीन व ऐतिहासिक पर्यटनस्थळे पहात असताना महिलांनी ‘हाय हील्स’ घालण्याला मनाई आहे.

Leave a Comment