४२०० कोटींना अ‍ॅमेझॉनने विकत घेतले ‘मोअर’

more
नवी दिल्ली – वॉलमार्ट-फ्लिपकार्टच्या विलीनीकरणाला सडेतोड प्रत्युत्तर म्हणून आदित्य बिर्ला समूहाचा रिटेल व्यवसाय खरेदी करण्याचा बेत अ‍ॅमेझॉनने जाहीर केला आहे. बिर्ला समूहातील ‘मोअर’ ही ५०० हून अधिक दालनांची शृंखला ४२०० कोटी रुपयांना खरेदी केली जाणार आहे. जागतिक गुंतवणूकदार कंपनी सामरा कॅपिटलच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन हा व्यवहार करत आहे.

फ्लिपकार्ट खरेदीचा व्यवहार वॉलमार्टने गेल्याच महिन्यात पूर्ण केला. भारतातील किराणा क्षेत्राने थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावरून याबाबत आक्षेप घेतला आहे. असे असतानाही आदित्य बिर्ला रिटेलमधील ५१ टक्के हिस्सा घेण्याचे अ‍ॅमेझॉनने निश्चित केले आहे. तर सामराकडे उर्वरित ४९ टक्के भागीदारी असेल. बिर्ला समूहातील ‘मोअर’ ही दालनसंख्येबाबत देशातील संघटित किरकोळ विक्री क्षेत्रातील चौथी मोठी नाममुद्रा आहे. फ्युचर समूहातील बिग बझार ही नाममुद्रा यात तूर्त अव्वल आहे. तर रिलायन्स रिटेल आणि डी-मार्ट अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहे.

गेल्याच वर्षी शॉपर्स स्टॉपमधील ५ टक्के हिस्सा अ‍ॅमेझॉनने १८० कोटी रुपयांना खरेदी केला. पण स्पर्धक फ्लिपकार्ट व वॉलमार्टच्या एकत्रीकरणाने अ‍ॅमेझॉनपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. अ‍ॅमेझॉनने भारतात ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे ध्येय राखले आहे. पैकी ३.८४ अब्ज डॉलरची गुंतवणूक आतापर्यंत झाली आहे.

Leave a Comment