रिलायन्स कम्युनिकेशन्सची टेलिकॉम क्षेत्रातून एक्झिट

anil-ambani
मुंबई – अनिल अंबांनीनी मुंबईत तोट्यात असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने टेलिकॉम क्षेत्रातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. त्यांनी ही घोषणा कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. ४० हजार कोटींचे कर्ज रिलायन्स कम्युनिकेशन्सवर असून त्यांनी कंपनीच्या १४ व्या वार्षिक सभेत तोट्यात चाललेली ही कंपनी बंद करणेच हिताचे असल्याचे सांगितले.

रिलायन्स ग्रुप यापुढे रिअल इस्टेट क्षेत्रातच आपले सर्व लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिलायन्स रिअॅल्टी हे कंपनीच्या वृद्धीसाठीचे इंजिन ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.एकूण ३८ भागदारांचे ४० हजार कोटींचे कर्ज रिलायन्स कम्युनिकेशन्सवर असून संसाधनांच्या विक्रीतून लवकरच ते फेडण्यात येईल असे त्यांनी वार्षिक सभेत सांगितले.

टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओच्या आगमनामुळे इतर कंपन्यांचा या क्षेत्रात निभाव लागणे कठीण असल्याचे ते म्हणाले. जिओ वगळता टेलिकॉम क्षेत्रातील सर्वच कंपन्या तोट्यात गेल्या आहेत. टेलिकॉम क्षेत्रातील बँकांनी कंपन्यांना दिलेले ७.७ लाख कोटींचे कर्ज बुडीत निघाले आहे. या क्षेत्रातील २० लाख लोकांना आपल्या नोक-या गमवाव्या लागल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

रिलायन्स जिओ रिलायन्स कम्युनिकेशन्सची संसाधने व फायबर सेवा खरेदी करणार असून त्यातून कंपनीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या टेलिकॉम क्षेत्रातून बाहेर पडण्याच्या निर्णयात साथ दिल्याबद्दल त्यांनी आपले मोठे भाऊ व रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे यावेळी आभार मानले.

Leave a Comment