मंगळ ग्रहाबद्दल ही आहेत काही रोचक तथ्ये

mars
मंगळ ग्रहाबद्दल गेली अनेक शतके अनेक शोध सुरु असून त्याविषयी काही ना काही माहिती सतत प्रसिद्ध होत असते. सूर्यमालेमध्ये पृथ्वीनंतर येणारा हा ग्रह मानवी जीवनासाठी योग्य आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी गेली कित्येक वर्षे प्रयत्न सुरु आहेत. हा ग्रह, इतर ग्रहांच्या मानाने आकाराने लहान असून, आकाशामध्ये हा ग्रह लालसर दिसतो. या ग्रहाबद्दल आणखी काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.
mars1
पृथ्वीवर जितकी गुरुत्वाकर्षणशक्ती आहे, त्याच्या केवळ एक तृतीयांशच गुरुत्वाकर्षणशक्ती मंगळावर आहे. तसेच मंगळावरून दिसणारा सूर्यास्त सोनेरी न दिसता निळसर दिसतो. मंगळावर असणाऱ्या धुळीच्या कणांमधून केवळ निळा रंग अधिक प्रभावी रित्या परावर्तीत होऊ शकत असल्याने सूर्यास्ताचा प्रकाश येथे निळसर दिसतो. पृथ्वीवरुन पाहताना मंगळ लालसर दिसत असला, तरी वास्तविक या ग्रहाचा पृष्ठभाग रंगेबिरंगी आहे. हा सोनेरी, भुरा, हिरवा, आणि इतरही अनेक रंगांचा पृष्ठभाग असलेला ग्रह आहे.
mars2
ज्याप्रमाणे पृथ्वीवर अनेक ऋतू आहेत, त्याप्रमाणे मंगळ ग्रहावरही चार ऋतू आहेत. मात्र यांचा कालावधी पृथ्वीवरील ऋतूंच्या मानाने अधिक आहे. तसेच मंगळ ग्रहावरील एका वर्षामध्ये ६८७ दिवस असतात. हा कालावधी पृथ्वीवरील दोन वर्षांच्या कालावधीच्या आसपास आहे. म्हणूनच मंगळ ग्रहावरील ऋतूंचा कालावधी देखील पृथ्वीवरील ऋतूंच्या काळाच्या मानाने अधिक आहे. मंगळ ग्रहाला दोन नैसर्गिक उपग्रह आहेत. फोबोस आणि डेयमोस नामक हे दोन्ही चंद्र गोलाकार नाहीत. फोबोस हा चंद्र दिवसातून दोनदा उगवतो आणि दोनदा मावळतो, तर डेयमोस या चंद्राला पूर्वेकडून उगवून पश्चिमेकडे मावळण्यासाठी सत्तावीस दिवसांचा कालावधी लागतो.
mars3
मंगळ ग्रहावरील शीत ऋतू पृथ्वीवरील शीत ऋतूच्या मानाने जास्त तीव्र आहे. या ठिकाणी पारा -५५ अंशांच्या खाली उतरतो. एके काळी या ग्रहाचा एक पंचमांश भाग विशाल महासागराने व्यापलेला होता. अनेक ठिकाणी या महासागराची खोली अनेक मैल होती. एके काळी या महासागराचा विस्तार वीस मिलियन क्युबिक किलोमीटर्स असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पण त्यानंतर कालांतराने या ग्रहावरील तापमानामध्ये सातत्याने कमी होत गेल्यानंतर हा महासागर बर्फाच्छादित होऊन गेला. या ग्रहावरील हवामान अतिशय थंड असून येथे सतत थंड वारे वाहत असतात. या ग्रहाच्या भोवती ओझोनचे संरक्षक कवच जवळजवळ नाहीच. त्यामुळे हानिकारक किरणांचे उत्सर्जन या ग्रहावर जास्त आहे. मंगळावरील मातीमध्ये लोह मुबलक प्रमाणामध्ये आहे. हे लोह सतत गंजत असल्याने मंगळावरील माती लालसर भासते.

Leave a Comment