दिवाळीआधी बाजारात येणार २० रुपयाची नवी नोट!

note
नवी दिल्ली – भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नोटबंदीनंतर आमुलाग्र बदल झाले आहेत. तर बहुतांश नवीन नोटांचा रिझर्व्ह बँकेनेही भारतीय चलनात समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वप्रथम, २ हजारांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. त्यानंतर, ५०० रुपयांची, २०० रुपयांची, ५० रुपयांची, १० रुपयांची आणि आता १०० रुपयांची नवीन नोट बाजारात आली आहे. 20 रुपयांचीही नवी नोट आता लवकरच चलनात येणार आहे. २० रुपयांची ही नवी नोट दिवाळी पूर्वीच आपल्याला पाहायला मिळू शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.

२० रुपयांच्या या नोटेचे डिझाईन भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तयार करण्यात आले असून सध्या प्रिंटींग पेपरचे काम सुरू आहे. सध्या या नोटेच्या रंगावरुन गोंधळ असला तरी पहिल्या डिझाईनमध्ये गडद लाल रंगाची किनार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथील अजंठा लेण्यांचे छायाचित्र या नोटांवर असणार आहे. त्यामुळे २० रुपयांच्या नोटेवर महाराष्ट्राला स्थान मिळणार असल्याचे दिसून येते. नवीन २० रुपयांची नोट जुन्या २० रुपयांच्या नोटेपेक्षा आकाराने २० टक्के कमी असणार आहे. इतर नोटांप्रमाणेच २० रुपयांच्याही नोटेला अत्याधुनिक सुरक्षेसह बनविण्यात येत आहे.

Leave a Comment