अवकाशात मानव पाठवण्याच्या गगनयान मोहीमेची घोषणा

gagan-yan
बंगळुरू – फ्रान्सच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख जीन व्येस ले गॉल यांनी भारताचा अंतराळात मानव पाठवण्यासाठीचा पहिला प्रकल्प ‘गगनयान’ची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी १५ ऑगस्ट रोजी आपल्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात भारत आणि फ्रान्स संयुक्तरित्या करत असलेल्या या महत्वकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती.

तीन माणसांना २०२२ पर्यंत अवकाशात पाठवण्यासाठी इस्त्रो प्रयत्नशील असून भारत हा रशिया, अमेरिका व चीननंतर अंतराळात मानव पाठवणारा चौथा देश ठरणार आहे. भारताची अंतराळ संस्था (इस्त्रो) आणि फ्रान्सची अंतराळ संस्था (सीएनईएस) या दोघांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. अवकाशातील मानवी आरोग्य, रेडिओ उत्सर्जन, कचरा व्यवस्थापन यासंबंधीच्या संशोधनावर तज्ञांचे काम चालू असल्याचे गॉल यांनी सांगितले.

गॉल यांनी भविष्यातील भारतीय अंतराळवीरांना अवकाशात राहण्याचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित करण्यावर आमचा कटाक्ष असल्याचे सांगितले. याबाबत फ्रान्सच्या प्रॉक्झिमा प्रकल्पातील अनुभवाचा भारताला उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इस्त्रोच्या पूर्वीच्या अवकाशमोहीमेचा अनुभव आमच्या कामी येणार असल्याचेही ते म्हणाले. भारत- फ्रान्समधील सहकार्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीवर हा प्रकल्प यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment