कर्नाटकातील ‘शिक्षकांचे गाव’- गावातील प्रत्येक परिवारामध्ये शिक्षक

teacher
विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे सुवचन सत्यात उतरविले आहे, कर्नाटकातील एका लहानशा गावाने. या गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक परिवारातील किमान एक तरी सदस्य व्यवसायाने शिक्षक आहे. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील इंचल या गावामध्ये राहणारे हे सर्व परिवार आहेत. या गावाची एकूण जनसंख्या सहा हजारांच्या आसपास असून, त्यातील तब्बल सहाशे व्यक्ती व्यवसायाने शिक्षक आहेत. म्हणूनच इंचल हे गाव कर्नाटकातील ‘शिक्षकांचे गाव’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. इंचल गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक परिवारामध्ये किमान दोन ते तीन व्यक्ती शिक्षकी पेशामध्ये आहेत. या गावाचे रहिवासी असणाऱ्या शब्बीर मिरजन्न्वार याच्या परिवारातील तर तब्बल तेरा सदस्य पेशाने शिक्षक आहेत.

या गावातील बहुतेक सर्व शिक्षक मंडळी केवळ बेळगावी येथेच नाही तर संपूर्ण कर्नाटकातील निरनिराळ्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. या गावातील परिवारातील सदस्यांनी शिक्षक म्हणून सेवा करण्याचा पर्याय निवडल्याने या गावामधील सर्वच परिवारांमध्ये शिक्षणाचे महत्व मोठे आहे. त्यामुळे केवळ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून न थांबता त्यापुढे देखील उच्चशिक्षण घेण्याची महत्वाकांक्षा गावातील प्रत्येक तरुण-तरुणीने उराशी बाळगलेली आहे. त्यांच्या परिवारांचा देखील त्यांना संपूर्ण पाठींबा आहे.

शिक्षणाबद्दल इतकी आसक्ती मनामध्ये असल्याचे परिणाम म्हणूनच की काय, पण इंचल सारख्या लहानशा गावामध्ये देखील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा तर आहेतच, त्याशिवाय महाविद्यालय, BAMS कॉलेज आणि संस्कृत विद्यालयही आहे.

Leave a Comment