विदेशवारी करीत आहात? मग घ्या या गोष्टींची खबरदारी

travel
सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये देशांतर्गत प्रवासासोबतच आजकाल परदेशी वारी करण्याचे अनेक चांगले पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. पण परदेशी जायला निघण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपला प्रवास कोणत्याही अडचणींच्या शिवाय, अगदी बिनदिक्कत पार पडावा. यासाठी काही गोष्टींची खबरदारी आधीपासूनच घेऊन ठेवणे अगत्याचे आहे.
travel1
परदेशामध्ये गेल्यानंतर काय खायचे आणि कुठे हा आपल्यासमोरचा सर्वात मोठा प्रश्न असतो. अश्या वेळी, जिथे स्थानिक ‘स्ट्रीट फूड’ उत्तम मिळत असेल अश्या भागांची माहिती घेऊन ठेवावी. या भागांमध्ये मिळणारे खास स्थानिक पदार्थ चाखण्यासाठी पर्यटकांची गर्दी जास्त असते, आणि म्हणूनच हे पदार्थ अतिशय उत्तम प्रकारे बनविले जात असतात. त्यामुळे परदेशामध्ये जाऊन तिथले पारंपारिक, स्थानिक पदार्थ खाण्याचा आनंद घेण्याची संधी तर मिळतेच, शिवाय हे पदार्थ तुमच्या समोर अगदी ताजे बनविले जात असतात. त्यामुळे पॅकेज्ड किंवा डबाबंद खाद्यपदार्थ खाण्याऐवजी हा पर्याय चांगला ठरेल.
travel2
प्रवासाला जाण्यापूर्वी ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेतलेला असावा. अनपेक्षितपणे सामान हरविणे किंवा चोरीला जाणे, किंवा अचानक उद्भविलेल्या वैद्यकीय इमर्जन्सीसाठी खर्च या इन्श्युरन्सच्या रकमेतून मिळणे शक्य होते. तसेच ज्या ठीकाणी आपण प्रवासाला जाणार असू, तिथल्या स्थानिक भाषेतील महत्वाचे शब्द लिहून ठेवावेत. स्थानिक नागरिकांना इंग्रजी भाषा येत असेलच असे नाही, त्यामुळे आपल्याला मदतीची गरज असल्यास किमान आपली गरज व्यक्ती करता येण्याइतके शब्द आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.
travel3
स्थानिक पर्यटनस्थळांना भेट देताना जर आपल्यासोबत गाईड नसेल, तर त्या ठिकाणी कसे पोहोचायचे हे दर्शविणारा नकाशा आपल्या सोबत जरूर ठेवावा. आजकाल सर्वांकडे स्मार्ट फोन असल्यामुळे त्यावर उपलब्ध असलेल्या जीपीएस मुळे आपल्याला एखाद्या ठिकाणी कसे पोहोचायचे त्याचे अचूक मार्गदर्शन आपल्याला मिळते. त्याशिवाय आपण ज्या ठिकाणी राहणार असू तिथून जवळ असलेल्या रेस्टॉरंटस् , रुग्णालय आणि जवळचे पोलीस स्टेशन याबद्दलची माहिती देखील आपल्याकडे असावी. प्रवासाला निघण्यापूर्वी पासपोर्ट आणि अन्य आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आपल्याजवळ असाव्यात. त्याचबरोबर आपण नियमित घेत असलेल्या औषधांचे आणि मेडिकल इमर्जन्सी साठी आपण बरोबर नेत असलेल्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन आपल्या सोबत असणे गरजेचे असते. परदेशी चलन बरोबर नेताना त्याची पावतीही आपल्यासोबत ठेवावी. या सर्व कागदपत्रांची जुळणी प्रवासाला निघण्यापूर्वी करून ठेवणे चांगले.

Leave a Comment