मनुष्याला चमत्कारी शक्ती प्रदान करणारा ‘सुपर सूट’


आजकाल स्मार्ट फोन ही चैनीची वस्तू राहिली नसून, आता ती गरज बनली आहे. इतरांशी संपर्क साधणे एवढेच या फोनचे काम नाही, तर हा फोन तुमचे अलार्म क्लॉक, व्यक्तिगत रिमाईंडर, तुमचा आवश्यक डेटा सेव्ह करणारा लहानसा संगणक अशी सर्वच कामे करीत असतो. स्मार्ट फोनच्या जोडीने आता स्मार्ट वॉचही लोकप्रिय होत आहे. विशेषतः ज्या व्यक्ती स्वतःच्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरूक असतात, त्यांना आपण दिवसातून किती पावले चाललो, किती कॅलरीज खर्च केल्या याची माहिती खूप मोलाची असते. त्यामुळे आजकाल पुष्कळ व्यक्तींच्या मनगटावर स्मार्ट वॉचेस पाहायला मिळतात. अश्या प्रकारच्या उपकरणांनी, आणि आधुनिक तंत्रज्ञानाने लोकांचे आयुष्य खरच पुष्कळ सोपे झाले आहे.

एका सर्वेक्षणाच्या नुसार २०५० सालापर्यंत साठीच्या पुढील लोकांच्या संख्येमध्ये जगभरात लक्षणीय वाढ होणार असून, या लोकांचे आरोग्यसंवर्धन ही सर्वात मोठी समस्या असणार आहे. वाढत्या वयामध्ये हिंडण्या-फिरण्यामध्ये अडचण येणे ही सर्वात सामान्य समस्या आहे. त्यामुळे कोणी सोबतीला नसताना रोजची कामे घराबाहेर पडून पार पाडणे, हे या लोकांसमोर असणारे मोठे आव्हानच म्हणावे लागेल. या समस्यावर उपाय शोधण्याच्या रोखाने वैज्ञानिक काम करीत आहेत. यामध्ये शरीरावर घालता येईल असा एक सूट तयार करण्याचे काम वैज्ञानिक सध्या करीत आहेत. एसआरआयइ (सिस्मिक) इंटरनॅशनल नावाच्या रिसर्च सेंटर द्वारे एक असा बॉडी सूट तयार केला जात आहे, तो वजनाने अतिशय हलका असून, आरामदायीही आहे. हा सूट धारण केल्यानंतर स्नायूंना ताकद मिळून, हिंडणे, फिरणे आणि रोजची कामे करणे वयस्क व्यक्तींना सहज शक्य होऊ शकते.

या सूटच्या ‘इलेक्ट्रॉनिक स्नायूंना’ त्यामध्ये लावलेल्या एका लहानश्या मोटरने ऊर्जा मिळते. हे स्नायू मानवी स्नायूंप्रमाणे काम करतात. तसेच शरीराच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी यामध्ये एक लहानसा संगणक आणि सेन्सर्सही लावलेले आहेत. या सेन्सर्समुळे स्नायूंनी कधी कार्यरत व्हायला हवे याची सूचना मिळत असते. मोटर, बॅटरी, कंट्रोल बोर्ड असे या सूटमधील महत्वाचे भाग एका लो प्रोफाईल पॉडमध्ये लावलेले आहेत. या सूटमुळे वयस्क मंडळींना कोणत्याही आधाराच्या शिवाय हिंडणे फिरणे सहज शक्य होणार आहे. हा सूट अतिशय उपयोगी तर आहेच, शिवाय एका फॅशन डिझायनरच्या मदतीने हा सूट तयार केला गेला असल्याने हा अतिशय आकर्षकही आहे.

Leave a Comment