रस्त्यात उभा राहून बायोडेटा वाटला, नोकऱ्यांचा पाउस पडला


नोकरी मिळविण्यासाठी जेथे संधी आहे तेथे आपला बायोडेटा देणे हि सर्वमान्य पद्धत असली तरी ठिकठिकाणी अर्ज करूनही नोकरी मिळत नसेल तर? यावर अमेरिकेतील एका बेरोजगार तरुणाने नामी शक्कल लढविली आणि त्याच्यावर गुगल सह २०० कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिल्याची घटना घडली.

वेब डेव्हलपर असे क्वालिफिकेशन असणाऱ्या डेव्हिड कासारेज या तरुणाला सिलिकॉन व्हॅली मध्ये नोकरी हवी होती पण अनके प्रयत्न करूनही नोकरी हाती लागेना. या शोधाशोधीत त्याच्याकडचे पैसे संपले तेव्हा त्याने स्वतःचा रेझ्युमे रस्त्यात उभे राहून वाटायला सुरवात केली. आपल्याला कुणी भिकारी समजू नये म्हणून त्याने एक बोर्ड हातात धरला होता. त्यावर बेघर आहे पण यशासाठी भुकेला आहे, तरी माझा रेझ्युमे घ्या असे लिहिले होते.

एका महिलेने त्याचा हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि तो त्वरित व्हायरल झाला. आणि नवल म्हणजे गुगल, नेटफ्लिक्स, लिंकडेन सारख्या २०० कंपन्यांकडून त्याला नोकरीच्या ऑफर आल्या. डेव्हिडच्या म्हणण्यानुसार त्याने टेक्सास विद्यापीठातून व्यवस्थापन पदवी घेतली आहे. त्याने २०१४ ते १७ या काळात जनरल मोटर्स मध्ये नोकरी केली पण त्याला नोकरीवरून काढले गेले. त्याला घरी जायचे नव्हते. जवळचे पैसे संपत आले तरी त्याने हार मानली नाही आणि त्यातूनच त्याने सिलिकॉन व्हॅलीच्या गल्ल्या गल्ल्यात उभे राहून रेझ्युमे वाटले. त्याचे फोटो व्हायरल होताच हॅशटॅग गेट डेव्हिड अ जॉब याखाली काही जननी त्याला नोकरी मिळावी म्हणून मोहीम सुरु केली.

Leave a Comment