आयसीआयसीआय बँकेला १७ वर्षात प्रथमच तोटा


देशातील दोन नंबरची बडी बँक आयसीआयसीआयला गेल्या १७ वर्षात प्रथमच तोटा सहन करण्याची वेळ आली असून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेला १२० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. हा तोटा होण्यामागे व्हिडीओकॉन कर्ज घोटाळा कारण असल्याचे सांगितले जात आहे. या घोटाळा प्रकरणात सीइओ चंदा कोचर यांचे नाव आल्याने बँकेच्या विश्वसनीयतेवर प्रभाव पडला आहे.

गतवर्षी याच काळात बँकेने २०४९ कोटी रुपये नफा कमावला होता. शेअर बाजार जाणकार आणि बँकिंग जाणकार यानाही बँकेला तोटा होऊ शकतो याचा अंदाज बांधता आला नव्हता कारण शुक्रवारी बँकेचा शेअर तेजीत होता आणि बँकेच्या शेअर मध्ये २.६२ टक्के वाढ झाली होती. कोचर यांची व्हिडीओकॉन प्रकरणी सीबीआय कडून चौकशी सुरु आहे. दरम्यान बँकेने व्हिडीओकॉनला दिलेले २९१० कोटी रुपयांचे कर्ज बुडीत घोषित केले आहे.

२०१२ मध्ये २० बँकांच्या कन्सोर्टीयमच्या नियमानुसार व्हिडीओकॉन ग्रुप ला ४० हजार कोटीचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये आयसीआयसीआय ने ३२५० कोटी कर्ज मंजूर केले होते.

Leave a Comment