पोटावरील चरबी कमी करण्याकरिता आजमावा या आयुर्वेदिक टिप्स


आयुर्वेदानुसार, पोटावरील चरबी वाढणे, हे शरीरातील ‘कफ’ दोष वाढला असल्याचे सूचक आहे. जर आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार, खाण्या-पिण्याच्या अनियमित वेळा, आणि सतत शारीरिक थकवा असेल, तर ही सर्व कारणे पोटावरील चरबी आणि पर्यायाने वजन वाढण्यास कारणीभूत ठरत असतात. सतत तेलकट, गोड पदार्थांच्या सेवनानेही शरीरातील कफ दोषामध्ये वृद्धी होत असते. तसेच यामुळे शरीराची चयापचयशक्ती कमी होऊन परिणामी वजन वाढते.

ह्या समस्येसाठी आयुर्वेदामध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहेत. वजन घटविणे व पोटावर साठलेली चरबी कमी करणे हा काही रातोरात घडून येऊ शकेल असा चमत्कार खचितच नाही. पण आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय जर अवलंबले गेले तर वजन आणि पोटाचा घेर कमी करण्यास नक्कीच मदत होऊ शकते. या उपायांमध्ये अश्या अनेक वस्तू वापरल्या गेल्या आहेत ज्या सर्वांच्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात.

मेथीदाणे हे अनेक पौष्टिक तत्वांनी युक्त आहेत. यामध्ये ‘गलाक्टो मन्ना’ नामक पाण्यामध्ये विरघळणारे तत्व असते. याच्या सेवनाने पोट खूप वेळ भरलेले राहून वारंवार काही तरी खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवता येते. याच्या सेवनाने शरीराची चयापचय शक्ती वाढून वजन घटण्यास मदत होते. याचे सेवन करण्यासाठी थोडे मेथीदाणे तव्यावर कोरडे भाजून घेऊन, कुटून घ्यावेत. सकाळी उठल्याबरोबर ही मेथीदाण्याची पावडर पाण्यासोबत घ्यावी. किंवा काही मेथीदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेऊन सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चावून खावेत.

गुग्गुळ या औषधीमध्ये गुग्गुळस्टेरोन नामक तत्व असते. हे तत्व वजन घटविण्यास सहायक असून, याच्या सेवनाने कोलेस्टेरोलची मात्रा ही नियंत्रित राहते. तसेच विजयसार नामक औषधी मधुमेह आणि लठ्ठपणा नियंत्रणामध्ये आणण्यासाठी वापरली जाते. आवळा, हरीतकी आणि बिभितकी यांच्या मिश्रणाने बनविलेले त्रिफळा हे देखील वजन घटविण्यास सहायक आहे. हे चूर्ण रात्रीच्या जेवणाच्या दोन तास आधी गरम पाण्यासोबत घेतल्याने, व सकाळच्या नाश्त्याच्या अर्धा तास आधी घेतल्याने लाभ होतो. दालचिनीच्या सेवनानेही शरीराची चयापचय शक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी दालचिनी घालून उकळलेले पाणी सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी प्यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment