समोसे विकण्यासाठी त्याने सोडली चक्क ‘गूगल’ची नोकरी


मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी तरुणांना रोजगाराच्या नावाखाली ‘पकोडे’ विकण्याचा सल्ला दिला. त्यावर चांगलेच काहूर माजले होते. विरोधकांनी तर मोदींच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. पण समोसे विकण्यासाठी एक तरुणाने चक्क ‘गूगल’ची नोकरी सोडली आणि हा तरुण आज वर्षाला ५० लाख रुपयांपेक्षाही अधिकची कमाई करत आहे. मुनाफ कपाडिया असे या युवकाचे नाव असून केवळ जिद्दीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मुनाफने येथपर्यंत मजल मारली आहे.

एका फेसबुक पोस्टद्वारे मुनाफ कपाडियाने आपला संघर्ष मांडला आहे. या पोस्टमध्ये तो सांगतो, मी तो व्यक्ती आहे ज्याने गूगलची नोकरी समोसे विकण्यासाठी सोडली. मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आणि बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये मुनाफचे समोसे विशेष लोकप्रिय आहेत.

एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर मुनाफने काही कंपन्यांमध्ये नोकरीही केली आणि त्यानंतर परदेशाची वाट त्याने धरली. त्याने परदेशात काही कंपन्यांमध्ये मुलाखत दिल्यानंतर ‘गूगल’मध्ये त्याला नोकरी मिळाली. त्याने काही वर्षांपर्यंत गूगलमध्येही नोकरी केली. पण यापेक्षा काहीतरी वेगळे आपल्याला करायचे आहे, असे त्याला वारंवार वाटत होते आणि त्याने घरवापसी केली. मुनाफने त्यानंतर भारतात येऊन ‘बोहरी किचन’ नावाने एक रेस्टॉरंट सुरू केले. टीव्ही पाहण्याची मुनाफच्या आईला नफिसा यांना हौस आहे. त्यात त्यांना टीव्हीवरचे फूड शोज पाहण्याची हौस असल्यामुळे त्यांच्या हातालाही एक वेगळीच चव असल्याचे मुनाफ सांगतो. आपल्या आईकडून काही टिप्स घेऊन मुनाफने फूड चैन सुरू केले.

अवघ्या काही वर्षांतच मुनाफचे ‘द बोहरी किचन’ मुंबईतच नाही तर देशभरात प्रसिद्ध झाले. यामध्ये रेस्टॉरन्टची खासियत म्हणजे त्यात मिळणारा ‘मटन समोसा’. ‘द बोहरी किचन’च्या केवळ मटन समोसाच नाही तर मटन रान, नर्गिस कबाब, डब्बा गोश्त, करी चावल अशा अनेक डिश प्रसिद्ध आहेत. रेस्टॉरन्टचा टर्नओव्हर गेल्या दोन वर्षांत ५० लाख रुपयांच्या घरात पोहचला आहे.

Leave a Comment