वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात मुलाने काही तासांत कमवले ३५०० कोटी


नवी दिल्ली – शिक्षकीपेशा सोडून व्यवसाय सुरु केला आणि त्यांनी आपल्या कर्तबगारी आणि मेहनतीवर तोट्यात चालणाऱ्या अनेक कंपन्या काही वर्षांतच विकत घेतल्या आणि अब्जावधींचे साम्राज्य उभे केले. आता त्याच पित्याच्या मुलाने अवघ्या काही तासांत तब्बल ३५०० कोटी रुपयांची कमाई केली असून या कंपनीला केंद्र सरकारने काही वस्तू आणि सेवांवर जीएसटी रेट घटवण्याचा फायदा झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या हॅवल्स इंडिया संदर्भात आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

नुकत्याच जीएसटी परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत टीव्ही, वाटर हीटर, इलेक्ट्रिक आयरनिंग मशीन, रेफ्रिजरेटर, हेअर ड्रायर, व्हॅक्यूम क्लीनर, फूड अप्लायंसेज इत्यादींवरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केल्यामुळे शेअर बाजारात हॅवल्स इंडियाच्या शेअरने उसंडी मारली. ९ टक्क्यांहून अधिक वाढ कंपनीच्या शेअरमध्ये होऊन ६१० रुपयांपर्यंत प्रति शेअरची किंमत पोहोचली.

प्रोमोटर आणि सीएमडी अनिल राय गुप्ता यांच्या नेतृत्वातील कंपनीची मार्केट व्हॅल्यू सरकारने जीएसटी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने ३५०० कोटी रुपयांनी वाढली आहे. कंपनीची मार्केट व्हॅल्यू शुक्रवारी स्टॉक मार्केटच्या क्लोझिंगला ३४,७०० कोटी रुपये होती. जी सोमवारी अवघ्या तासांतच वाढून ३८,२०० कोटी रुपये झाली आहे. सीएमडी अनिल गुप्ता यांचे वडील कीमत राय गुप्ता यांनी या कंपनीचा पाया रोवला होता. त्यांचे २०१४ मध्ये निधन झाले. ते कंपनी सुरू करण्यापूर्वी एक शिक्षक होते.

पंजाबमध्ये एक शिक्षक म्हणून कीमत राय गुप्ता कार्यरत होते. ते आपल्या शिक्षकी पेशावर समाधानी नव्हते आणि १९५८मध्ये डोळ्यात मोठी स्वप्ने घेऊन दिल्ली गाठली. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त १० हजार रुपये होते. त्यांनी जुन्या दिल्लीत इलेक्ट्रिकल गुड्स ट्रेडिंगचे एक दुकान सुरू केले. त्यांना काही वर्षांतच स्वतःची कंपनी स्थापित करण्याचा विचार आला. त्यावेळी हवेली राम गुप्ता यांची कंपनी तोट्यात जात होती. त्याच कंपनीचे भवितव्य बदलण्याच्या ध्येयासह कीमत राय गुप्ता यांनी ती कंपनी १९७१ मध्ये ७ लाख रुपयांत विकत घेतली.

सर्किट प्रोटेक्शन डिव्हाइस, केबल आणि वायर, मोटर, फॅन, मॉड्युलर स्विच, होम अप्लायंसेज, इलेक्ट्रिक वाटर हीटर्स, पॉवर कॅपेसिटर्स, सीएफएल लँप्ससह हॅवेल्सने देशांतर्गत बाजारात आपली पकड मजबूत केली. त्यानंतर परदेशी बाजारात पाऊल ठेवले. त्यांनी २००७मध्ये आपल्या कंपनीचा आकार दुप्पट करण्यासाठी सिल्व्हेनिया कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हॅवेल्स कंपनी ही जगातील सर्वात चौथी मोठी लायटिंग कंपनी होती. हॅवल्स इंडिया या अधिग्रहणासोबतच जगातील टॉप-५ ची लायटिंग कंपनी बनली. याच्या एका वर्षांनंतरच आलेल्या जागतिक मंदीने कंपनीला मोठा तोटा झाला. पण हॅवल्सने संपूर्ण ताकदीने पुन्हा यश शिखर गाठले.

Leave a Comment