दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये ‘वाहन चालविणे’ विषयाचा समावेश?


देशामध्ये सर्वच ठिकाणी वाहन चालविण्याचे काम नागरिकांनी जबाबदारीने करावे, वाहन चालविण्याच्या संबधित नियमांची चालकांना पूर्ण माहिती असावी, या उद्देशाने वाहन चालविण्याच्या बाबतीतल्या नियमांच्या अध्ययनाचा समावेश, दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये ‘ड्रायव्हिंग’ या विषयाअंतर्गत केला जावा अशी शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस राज्यसभेच्या विशेष समितीने ‘मोटर वेहिकल बिल-२०१७’ च्या अंतर्गत केली आहे. लोकसभेतून पारित झालेला हा ठराव नुकताच राज्यसभेमध्येही मांडला गेला. त्यावेळी या ठरावावर चर्चा होत असताना, आणखीही अनेक तथ्ये समोर आली.

भू-तल परिवहन व राष्ट्रीय राजमार्ग मंत्रालयाच्या अहवालनुसार, रस्त्यांवर घडणाऱ्या एकूण अपघातांपैकी सुमारे ७६% अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे घडत असतात. तसेच अनेक राज्यांमध्ये वाहनचालकांना परवाने देताना योग्य नियमांचे पालन न करताच परवाने दिले जातात. अनेक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी परवाना मिळण्यासाठी जी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाणे बंधनकारक असते, त्यालाही अनेकदा फाटा दिला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परवानाधारक व्यक्ती खरोखरच वाहन व्यवस्थित चालवू शकते किंवा नाही हे न पाहताच परवाने दिले जात असतात. असेच चालक अपघातांसाठी जबाबदार ठरत असल्याचे मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.

त्यामुळे ‘ड्रायव्हिंग’ हा विषय दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला जाणे आवश्यक असल्याचा ठराव मांडण्यात आला असून, हा ठराव बहुमताने मंजूरही झाला असल्याचे समजते. यामुळे मुलांना गाडी चालवू लागण्यापूर्वीच वाहन चालनासाठी पाळाव्या लागणाऱ्या सर्व नियमांची माहिती आधीपासूनच मिळू शकेल असे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या विषयाची परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थांना, चालक म्हणून भर्ती होण्यासाठी वेगळी परीक्षा देणे गरजेचे नसल्याचेही या अहवालामध्ये म्हटले आहे. तसेच गाडीवर लाल बत्ती लावणे, सीट बेल्ट न लावणे, विमा उतरविला नसलेली वाहने चालविणे, ह्यावरही भरमसाट दंड लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.