
व्होडाफोनने रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलला टक्कर देण्यासाठी आपल्या १९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये बदल केला असून या प्लानमध्ये कंपनीकडून पहिलेच्या तुलनेत आता जवळपास दुप्पट डेटा मिळणार आहे.
व्होडाफोन देणार १९९ रुपयांत दररोज २.८ जीबी डेटा
१९९ रुपयांच्या प्लानमध्ये याआधी दररोज १.४ जीबी २जी/३जी/ ४जी डेटा मिळायचा. पण यूजर्सना आता दररोज २.८ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच २८ दिवसांसाठी ७८.४ जीबी डेटा मिळणार आहे. याचाच अर्थ १९९ रुपयांच्या अपग्रेडेड प्लानमध्ये १ जीबी डेटाची किंमत २.५३ रुपये होते. पण हा प्रीपेड प्लॅन केवळ निवडक व्होडाफोन सब्सक्राइबर्ससाठीच उपलब्ध असून या ऑफरचा लाभ आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडचे युजर्स घेऊ शकणार नाहीत.
युजरला या प्लॅनअंतर्गत दररोज २.८ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल्स सुविधा मिळेल. अमर्यादित कॉल्ससाठी २५० मिनिट दररोज व १००० मिनिट दर आठवड्याला अशी मर्यादा असेल. पण या प्लॅनअंतर्गत एसएमएसची सुविधा मिळणार नाही. यापूर्वीच्या १.४ जीबीच्या प्लॅनमध्ये १०० एसएमएस युजरला दररोज वापरासाठी मिळत होते.
