‘अर्थशास्त्र’चे निर्माणकर्ते चाणक्य ह्यांच्याविषयी काही रोचक तथ्ये


चंद्रगुप्त मौर्याचे राजकीय सल्लागार, तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, आणि राजकीय परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन त्याबरहुकूम पुढील योजना आखणारे असे अतिबुद्धिमान चाणक्य, आणि त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लवकरच चित्रपटाच्या माध्यामातून पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटामध्ये अभिनेता अजय देवगण, महापंडित चाणक्याच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये चाणक्याचे नाव जरी अजरामर असले, तरी त्यांच्याविषयीची अशी अनेक तथ्ये आहेत, जी फारशी सर्वश्रुत नाहीत. त्या निमित्ताने चाणक्य ह्यांच्याबद्द्लची काही ऐतिहासिक तथ्ये खास जाणून घेऊ या.

चाणक्य ह्यांचा जन्म ख्रिस्तपूर्व ३७१ साली झाला. त्यांचे खरे नाव कौटिल्य होते. काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार त्यांना विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जात असे, पण काही इतिहासकारांच्या मते कौटिल्य आणि विष्णुगुप्त ह्या दोन निराळ्या व्यक्ती होत्या. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संस्कृत विषयाचे अभ्यासक थॉमस बरो ह्यांच्या मते तर कौटिल्य आणि चाणक्य देखील वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. पण चाणक्याने लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ मध्ये त्याचे मूळ नाव ‘कौटिल्य’ असाच उल्लेख स्पष्ट आहे. फक्त एका काव्यामध्ये कौटिल्याचा उल्लेख ‘चाणक्य’ म्हणून झालेला आढळतो. त्यावरून चाणक्याचे खरे नाव कौटिल्य असल्याचे सिद्ध होते.

चाणक्य हे मौर्य राजवंशाचे आर्थिक आणि राजकीय सल्लागार असून, मोठे तत्वज्ञही होते. किंबहुना मौर्य वंशाच्या राज्याच्या स्थापनेमध्ये चाणक्याचा मोठा हात होता. मौर्य वंशाचे पहिले राजे चंद्रगुप्त चाणक्य ह्यांना आपले गुरु मानीत. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे मौर्यांचे राज्य विस्तार पावू शकले. चंद्रगुप्ताप्रमाणे, त्याचा पुत्र बिंदुसार ह्यालाही चाणक्य ह्यांचे मार्गदर्शन लाभले. चाणक्य ह्यांनी मौर्य वंशाच्या राजवटीला सत्तेवर येण्यासाठी सहाय्य करण्यामागे एक मोठे कारण होते. मगध प्रांतावर राज्य करीत असलेल्या नंद राजवंशाच्या राजाकडून अपमानित केले गेल्यानंतर चाणक्य ह्यांनी नंद वंशाच्या नाशाचा विडा उचलला. त्याकाळी मगधचे साम्राज्य भारतातील अतिशय बलशाली साम्राज्यांपैकी एक होते. पण नंद राजाने केलेला अपमान सहन न होऊन चाणक्य ह्यांनी मगधच्या साम्राज्यातून वेगळे केल्या गेलेल्या चंद्रगुप्ताशी हातमिळवणी केली.

चाणक्याच्या मदतीने चंद्रगुप्त मौर्याने आपले लहानसे सैन्य उभारले, आणि मगधची राजधानी पाटलीपुत्र येथे शिरकाव करून नागरी युद्ध सुरु करविले. ह्या कामी चाणक्याने आपल्या अनेक गुप्तहेरांची देखील मदत घेतली. अखेर चंद्रगुप्ताचा विजय होऊन ख्रिस्तपूर्व ३२२ साली चंद्रगुप्ताने राज्यकारभार हाती घेतला. चंद्रगुप्ताच्या वंशजांनी ख्रिस्तपूर्व १८५ सालापर्यंत राज्य केले. राज्यकारभार कसा चालवावा, ह्याचे विस्तारपूर्वक ज्ञान देणारा ‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ चाणक्याने लिहिला. मात्र हा ग्रंथ काळाच्या ओघामध्ये कुठेतरी लुप्त झाला होता. त्यानंतर १९०४ साली भूर्जपत्रांवर लिहिलेल्या, पोथीवजा दिसणाऱ्या ह्या ग्रंथाचा शोध लागला. राज्यकर्त्याने राज्य कसे चालवावे, तसेच आसपासच्या राज्यांशी राजकीय संबंध कसे प्रस्थापित करावेत ह्याचे विवरण चाणक्याने ह्या ग्रंथामध्ये केलेले आहे.

त्या काळतील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक व्यवस्था लक्षात घेता, राज्यामध्ये कायदेव्यवस्था कशा प्रकारची असावी, गुन्हेगारांसाठी शासन कसे असावे, कर कशाप्रकारे आकारले जावेत, चलन ( पैसे ), वस्तूंचे उत्पादन, व्यापार, सरकारी कारभार आणि राज्याची सुरक्षा ह्यासंबंधी विस्तारपूर्वक मार्गदर्शन ह्या ग्रंथामध्ये केलेले आहे. ह्या ग्रंथाखेरीज अन्य अनेक वेदांचे, पुराणांचे आणि इतरही अनेक ग्रंथांचे सखोल अध्ययन करून चाणक्याने ‘चाणक्य नीती’ ही लिहिली. अश्या ह्या महापंडिताचे निधन ख्रिस्तपूर्व २८३ साली झाले. काहींच्या मते त्यांनी अन्नत्याग करून प्राण सोडले, तर काहींच्या मते चाणक्याच्या राजकीय शत्रूंनी कारस्थान करून त्यांना संपविले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *