उत्तम आरोग्यासाठी आपल्या आहारामध्ये ही पीठे अवश्य करा समाविष्ट


उत्तम आरोग्यासाठी व्यायामाबरोबरच योग्य आणि संतुलित आहारही आवश्यक असतो, हे आपल्याला माहिती असूनही आहाराच्या बाबतीत आपण नेहमीच आवश्यक ती खबरदारी घेतो असे नाही. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मनाला भुरळ घालणारे अनेक तऱ्हेचे फास्ट फूड्स. अतिशय चविष्ट आणि भरपूर कॅलरीज असलेले हे पदार्थ खाताना डायट, संतुलित आहार ह्या संकल्पनांचा आपल्याला काही वेळ विसर पडतो. त्यामुळेच बाहेरचे पदार्थ खाताना मनावर ताबा असणे आणि आपण खाणार असलेल्या पदार्थांची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. ही सवय आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अंगीकारून आपला आहार त्यानुसार ठरविणे गरजेचे असते.

संतुलित आहार असण्यासाठी आपल्या आहारातून अनेक तऱ्हेचे पदार्थ कायमस्वरूपी वगळणे गरजेचे असते. ह्या पदार्थांमधील एक पदार्थ म्हणजे मैदा. आजकाल आपल्या आहारामध्ये असणारे अनेक पदार्थ मैदा वापरून बनविले जात असतात. पण ह्या ऐवजी आपण इतर पिठाचा समावेश आपल्या आहारामध्ये केला, तर ते आपल्या आरोग्यासाठी नक्कीच लाभकारी ठरेल. आजकाल बाजारामध्ये ही पीठे सहज उपलब्ध असून, मैद्याने बनविले जाणारे जवळजवळ सर्वच पदार्थ ह्या पिठांपासून तयार करता येऊ शकतात. किंबहुना ह्या पिठांपासून बनलेले अनेक पदार्थ बाजारामध्ये उपलब्धही आहेत.

नाचणी किंवा रागी पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये अगदी सहज उपलब्ध असणारे धान्य आहे. नाचणीच्या पिठाचा वापर आपल्या आहारामध्ये जरूर करावा. नाचणीमध्ये लोह आणि कॅलशियम मुबलक प्रमाणांत असते. ह्या पीठाचा उपयोग, भाकरी, आंबील, केक, इडली अश्या प्रकारचे पदार्थ बनविण्यासाठी केला जाऊ शकतो. ज्वारीचे पीठ ‘ग्लुटेन फ्री’ आहे. ह्यामध्ये फायबर, प्रथिने, आणि शरीराला आवश्यक जीवनसत्वे आहेत. ह्या पिठाची भाकरी, आंबील, थालीपीठ इत्यादी पदार्थ आपल्या आहारामध्ये नियमित समाविष्ट करावेत.

आपल्याकडे बाजरी हे धान्य देखील मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. बाजरीमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. गरम गरम बाजारीची भाकरी आणि त्यावर घरचे ताजे लोणी आपल्यापैकी अनेक घरांमध्ये अतिशय चवीने खाला जाणारा पदार्थ आहे. त्याच बरोबर उत्तर भारतामध्ये प्रसिद्ध असणारे सत्तू किंवा कुट्टुची पिठे ही अतिशय पौष्टिक आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment