केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणी फेसबुकला ४.५६ कोटींचा दंड


सोशल मीडियात अग्रेसर असलेल्या फेसबुकला जगभरात गाजलेल्या केंब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणात पहिला मोठा दणका बसला असून फेसबुकला तब्बल $६६४,००० म्हणजे जवळपास ४.५६ कोटी रुपयांचा दंड ब्रिटनच्या सूचना रेग्युलेटरीकडून ठोठावण्यात आला आहे. कायद्याचे फेसबुकने उल्लंघन केले असून त्यांनी युजर्सच्या खासगी माहितीबाबत पारदर्शकता ठेवली नाही असा ठपका फेसबुकवर ठेवण्यात आल्याची माहिती ब्रिटनचे सूचना आयुक्त एलिजाबेथ डेनम यांनी दिली. या कारवाईनंतर इतर देश फेसबुकवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी जवळपास ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे वादात सापडली होती. केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीशी निगडीत या संपूर्ण प्रकरणाची पाळमुळ असून फेसबुक युजर्सचा डेटा, त्यांच्या लाइक्स आदी माहितीचा वापर २०१६ मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांत निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात आल्याचे समोर आले. ‘फेसबुक’वरील लक्षावधी नागरिकांचा तपशील त्यांच्या परवानगीशिवाय केंब्रिज अॅनालिटिकाने वापरला असा आरोप झाला. जवळपास पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे उघड झाले. फेसबुकच्या गोपनीयतेवरच या प्रकरणानंतर प्रश्न चिन्ह उभे राहिल्यानंतर फेसबुकविरुद्ध #DeleteFacebook ही मोहीम जोर धरून फेसबुक डिलीट करण्य़ाचे आवाहन फेसबुक युजर्सना करण्यात येत होते.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी प्रकरण चिघळल्यानंतर स्वतः या प्रकरणात आमची चुक झाल्याचे मान्य केले. स्वतःच्या फेसबुकपेजवर आणि अमेरिकेच्या संसदेतही या प्रकरणी त्यांनी जाहीर माफी मागितली होती. कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने युजर्सचा डेटा लीक केल्याचे समोर आल्यानंतर फेसबुकच्या शेअर्सवर परिणाम झालेला पहायला मिळाला होता. शेअर्स घसरल्याने फेसबुकला जवळपास ६.०६ अब्ज डॉलरचे (३९५ अब्ज रुपये) नुकसान झाले. तर अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली.

Leave a Comment