
सॅन फ्रान्सिस्को – ७ कोटी बनावट खाती ट्विटरने बंद केली असून मे आणि जूनमध्ये कंपनीने विशेष मोहीम सोडून अशा खात्यांची ओळख पटवली, ज्यांचा वापर ट्रोल आणि अफवा पसरवण्यासाठी केला जात होता. यासंदर्भात चीनची न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरने ही कारवाई राजकीय दबाव वाढल्यानंतर केली आहे.
अफवा अन् हिंसा पसरवणारी ७ कोटी बनावट अकाउंट ट्विटरने केली बंद
अमेरिकी संसद काँग्रेसने ट्विटरची इतर देशांतून कंट्रोल केले जात असलेल्या बनावट खात्यांवर निगराणी ठेवू न शकल्याने निंदा केली होती. ते म्हणाले होते की, अमेरिकेचे राजकारण अफवा पसरवणाऱ्या या अकाउंटमुळे प्रभावित होऊ शकते. ट्विटरच्या सूत्रांनुसार, खाते बंद करण्याचा दर ऑक्टोबरच्या तुलनेत दुपटीहून जास्त झाला आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये एका दिवसात १०-१० लाख खाते बंद करण्यात आले आहेत.
ट्विटरवर सर्वात जास्त ट्रोलच्या बाबतीत भारतीयही समोर येतात. काँग्रेस नेते प्रियंका चतुर्वेदी आणि त्यांची कन्या यांना काही दिवसांपूर्वी बनावट ट्विटर अकाउंटहून धमकी देण्यात आली होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही ट्रोल करण्यात आले होते. भारतातही ट्विटरचे ३.०४ कोटी युजर आहेत.
ट्विटरने मागच्या महिन्यात आपल्या प्लॅटफॉर्मवर द्वेष आणि हिंसा पसरवणाऱ्या पोस्टशी निपटण्यासाठी पॉलिसीत बदल केले होते. यासाठी नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करणे आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची घोषणा केली होती. कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट डेल हार्वे म्हणाले, हे सुनिश्चित केले जाईल की, ट्विटरच्या माध्यमातून लोकांना विश्वसनीय, प्रासंगिक आणि उच्च गुणवत्तेच्या सूचना मिळतील. संशयास्पद खात्यांवर ट्विटरच्या या कारवाईचा परिणाम त्यांच्या युजरच्या संख्येवर पडू शकतो. एप्रिल-जून तिमाहीचे आकडे येणे बाकी आहे, ज्यात युजर्सची संख्या घटू शकते.
