वजन घटविण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ह्या पेयांचे सेवन


शरीराचे अतिरिक्त वजन आणि पर्यायाने चरबी घटविणे ही काम सहज सोप्या रीतीने साध्य होणारे नाही. त्याकरिता अतिशय नियंत्रित आहार, व्यायाम आणि क्वचित प्रसंगी औषधोपचारांची देखील आवश्यकता भासत असते. वजन घटविण्याच्या कामी सहायक ठरतील अश्या प्रकारच्या काही डायट टिप्सचा उपयोग अश्या वेळी केला जाऊ शकतो. ह्या उपायांमुळे वजन घटविण्याच्या प्रयत्नांना गती मिळून कमी वेळामध्ये अपेक्षित परिणाम दिसणे शक्य होऊ शकेल. वजन कमी होण्यास सहायक काही पेयांमुळे शरीराची चयापचय शक्ती वाढून वजन घटू लागते. तसेच ही पेये शरीरातील पचनतंत्र सुधारून शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास ही सहायक ठरतात.

सिनामन टी, म्हणजे दालचिनीचा चहा किंवा काढा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी समजला जातो. हा चहा शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास सहायक असून, शरीराची चयापचय शक्ती वाढविण्यासही सहायक आहे. हा चहा बनविण्याकरिता एक कप कडकडीत गरम पाण्यामध्ये एक चमचा दालचिनीची पूड घालून हे मिश्रण वीस मिनिटे मुरत ठेवावे. त्यानंतर गाळून घेऊन ह्या चहाचे सेवन करावे. ह्यामध्ये साखरेचा वापर न करता आवडत असल्यास मधाचा वापर करावा. रात्री झोपण्याच्या वेळेच्या अर्धा तास अगोदर ह्या चहाचे सेवन करावे.

मेथी दाणे वजन घटविण्यासाठी सहायक असून, ह्याच्या नियमित सेवनाने शरीरामध्ये उष्णता वाढून त्याच्या सहाय्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. मेथी दाणे एक उत्तम ‘अँटासिड’ म्हणजे पित्तशामक आहे. पचनतंत्र सुदृढ करण्यासही मेथी दाणे सहायक आहेत. मेथी दाणे पाण्यामध्ये भिजवून ह्या पाण्याचे सेवन केल्याने वजन घटविण्यास मदत मिळते. हे पाणी तयार करण्यासाठी थोडे पाणी उकळून घेऊन त्यामध्ये मेथीदाणे खलबत्त्यामध्ये थोडे ठेचून घेऊन पाण्यामध्ये घालावेत. त्यानंतर हे मिश्रण झाकून ठेऊन काही वेळ मुरु द्यावे आणि मग गाळून घेऊन ह्या पाण्याचे सेवन झोपण्याच्या वेळेअगोदर अर्धा तास करावे.

कॅमोमाइल चहा हा केवळ वजन घटविण्यासच सहायक नसून, ‘फ्लुइड रिटेन्शन’ मुळे आलेली अंगावरील सूज, किंवा ‘ब्लोटिंग’ कमी करण्यासही सहायक आहे. ह्या चहामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आणि फ्लावेनॉईडस् मोठ्या प्रमाणात असून, कॅमोमाइल चहा, शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करणारे ‘डी-टॉक्स ड्रिंक’ आहे. ह्या पेयाने शरीरातील घातक द्रव्यांबरोबर शरीरातील साठून राहिलेले पाणी बाहेर पडण्यासही मदत होते. कॅमोमाइल चहा बाजारामध्ये अतिशय सहजात उपलब्ध असतो. रात्री झोपण्यापूर्वी ह्या चहाची पाने गरम पाण्यामध्ये काही मिनिटे मुरत ठेऊन त्याचे नियमित सेवन केल्याने वजन घटविण्यास मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment