त्वचेच्या सौंदर्यासाठी वरदान – केशर


केशर खरे तर पदार्थाला आगळा सुवास देण्यासाठी आणि रंग येण्यासाठी वापरला जाणारा जिन्नस आहे. पण खास पदार्थांचा रंग आणि स्वाद वाढविण्याशिवाय केशराचा उपयोग त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही केला जातो. त्वचेवरील डाग घालवून त्वचा नितळ, सुंदर बनविण्यासाठी केशराचा उपयोग प्राचीन काळापासून चालत आला आहे. केशराचे त्वचेसाठी असणारे फायदे अनेक आहेत. केशरामध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असून, ह्यामुळे त्वचेवर येणारे अॅक्ने नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच ह्याच्या वापराने वारंवार अॅक्ने येण्यापासूनही बचाव होतो. अॅक्ने किंवा मुरुमे पुटकुळ्यांसाठी केशराचा वापर करायचा झाल्यास सहा सात तुळशीची पाने आणि सहा सात केशराच्या काड्या घ्याव्यात. ह्या दोन्ही वस्तू थोड्याश्या पाण्यामध्ये भिजवून, त्यानंतर वाटून घेऊन त्याची पेस्ट बनवून ही पेस्ट चेहेऱ्यावर लावावी.

अनेकदा प्रदूषण, हार्मोन्सचे असंतुलन अश्या कारणांमुळे त्वचेवर काळसर डाग, म्हणजेच पिग्मेंटेशन दिसून येते. तसेच उन्हामुळे लहान लहान डागही चेहऱ्यावर पडू लागतात. हे डाग घालविण्यासाठी केशराच्या काही काड्या थोड्या पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये दोन चमचे हळद घालावी व ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. ह्यामुळे चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन व इतर डाग कमी होण्यास मदत होईल. जर काही कारणाने घाव होऊन त्याचे वण त्वचेवर राहिले असतील, तर हे वण हलके किंवा संपूर्णपणे नाहीसे करण्यासाठी देखील केशराचा उपयोग करता येतो. तसेच लहान जखम लवकर भरून येण्यासाठीही ह्याचा उपयोग होतो. ह्यासाठी दोन चेमचे केशर पाण्यामध्ये भिजवून बारीक वाटून घ्यावे. त्यामध्ये काही थेंब खोबरेल तेल मिसळून जखमेवर लावावे. हा उपाय काही दिवस केल्याने जखम लवकर भरून येईल व त्यानंतर त्याचे कोणतेही डाग त्वचेवर राहणार नाहीत.

त्वचा उजळण्यासाठी, उन्हामध्ये फिरल्याने त्वचेवर आलेला काळसरपणा त्वचेवरून हटविण्यासाठी आणि त्वचा नितळ, चमकदार बनविण्यासाठीही केशराचा वापर होतो. त्वचा उजळ, नितळ बनविण्यासाठी अर्धा कप कच्च्या दुधामध्ये केशर भिजत ठेवावे, आणि हे मिश्रण त्वचेवर लावावे. ह्यामुळे त्वचा चमकदार बनेल. तसेच काही केशराच्या काड्या चुरून दोन चमचे चंदनाच्या पावडरमध्ये मिसळाव्यात. त्यामध्ये गुलाबजल घालून त्याची पेस्ट बनवावी, व ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. पेस्ट सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवून टाकावा. ह्यामुळे त्वचा उजळून, उन्हामुळे त्वचेवर आलेला काळसरपणा कमी होण्यास मदत होते. खोबरेल तेलामध्ये केशराच्या काही काड्या टाकून हे तेल केसांसाठी वापरल्यास केस चमकदार होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment