व्हिडीओ; अवघ्या काही रुपयात आणि २४ तासात बनवू शकता थ्री डी प्रिंटेड घर


(छायाचित्र सौजन्य-Tech Insider)
केवळ चार हजार डॉलर्सच्या किंमतीत राहण्यासाठी उत्तम घर बनविता येऊ शकते असे म्हटले, तर अनेकांचा ह्यावर विश्वास बसणार नाही. पण ही करामत वास्तवात साध्य झाली आहे. हे शक्य झाले आहे, ते थ्री डी प्रिंटींगच्या सहाय्याने. इतक्या स्वस्तामध्ये घरे उपलब्ध होणे शक्य असल्याने अनेक निर्धन, किंवा आर्थिक दृष्ट्या सबल नसलेल्या कुटुंबांना आशेचा किरण दिसू लागला आहे. आर्थिक दृष्ट्या सबल नसलेल्या परीवारांसाठी, स्वतःचे घर असणे हे स्वप्न वाटते. आर्थिक पाठबळाच्या अभावी ह्या परिवारांना, अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये, जिथे कुठल्याही सोयी सुविधा नाहीत, स्वच्छतेचा अभाव आहे अश्या ठिकाणी राहण्यावाचून गत्यंतर नसते.

आता ‘न्यू स्टोरी’ नामक संस्था आणि ‘आयकॉन’ नामक कंस्ट्रक्शन कंपनी ह्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल परीवारांसाठी केवळ चार हजार डॉलर्स इतक्या खर्चामध्ये, राहण्यासाठी घरे तयार केली जाणार आहेत. घराच्या चार भिंती आणि घरामुळे आपल्याला मिळत असलेली सुरक्षा आपण गृहीत धरलेली असते. पण ह्या जगामध्ये असे अनेक परिवार आहेत, ज्यांना ही सुरक्षितता लाभलेली नाही, किवा आयुष्यभर मेहनत केल्यानंतरही स्वतःचे हक्काचे घर घेण्याची त्यांची ऐपत असणार नाही. अश्या परिवारांना ‘न्यू स्टोरी’ ह्या वसाहतीमध्ये स्वतःचे हक्काचे घर अतिशय माफक दरामध्ये उपबद्ध होणार असून, त्यानंतर ह्या परिवारांची आयुष्यच बदलून जातील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

थ्री डी प्रिंटींग तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनविलेल्या ह्या घरांची वसाहत एल साल्व्हाडोर येथे तयार करण्यात येत असून, एका घरासाठी चार हजार डॉलर्सपर्यंत खर्च येणार आहे. तसेच एक घर तयार करण्यासाठी चोवीस तासांचा अवधी पुरेसा असणार आहे. ह्या घराचा पहिला नमुना टेक्सास मधील ऑस्टीन येथे तयार करण्यात आला होता. सहाशे पन्नास स्क्वेअर फुटांचे हे घर बनविताना कॉन्क्रीटच्या ‘लेअर्स’ एका पाठोपाठ एक प्रिंट केल्या गेल्या. घराच्या भिंती उभ्या राहिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी खिडक्या, दारे, प्लंबिंग, विजेच्या तारा इत्यादी सर्व बसवून, हे घर अवघ्या चोवीस तासांमध्ये राहण्यासाठी सज्ज केले. ह्या घरामध्ये एक लिव्हिंग रूम, एक लहानसे ऑफिस, एक बेडरूम, एक बाथरूम अश्या खोल्या आहेत. हे नमुनादाखल तयार झालेले घर आयकॉन कंपनी तर्फे काही काळासाठी कार्यालय म्हणून वापरले जाणार आहे. ह्यामुळे ह्या घराची बळकटी तपासून पाहण्याची संधी देखील कंपनीला मिळणार आहे.

टेक्सास येथे थ्री डी प्रिंटींगच्या सहाय्याने घराचे यशस्वी निर्माण केल्यानंतर, आता एल साल्वाडोर ह्या भागामध्ये, स्वतःचे घर नसलेल्या परिवारांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याच्या उद्देशाने, थ्री डी प्रिंटींगच्या सहाय्याने बनविलेल्या घरांची मोठी वसाहत वसविण्याचा आयकॉन कंपनीचा हेतू आहे.

Leave a Comment