चीनकडून भारतीय मालावरील आयात शुल्कात कपात


बीजिंग – चीनने भारत आणि काही आशिया-पॅसिफिक देशांकडून होणाऱया आयात शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा चीनच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केली असुन आयात दरात १ जुलैपासून कपात करण्यात येणार आहे.

भारतासह दक्षिण कोरिया, बांगलादेश, लाओस आणि श्रीलंका या देशामधून आयातीत उत्पादनावर चीनकडून करण्यात आलेली ही दरकपात असणार आहे. रसायने, कृषी उत्पादने, वैद्यकीय साधने, पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादनांसारख्या मालावरील आयात शुल्कात सूट दिली जाणार आहे. या पाच देशांतील सर्व आयात केलेले उत्पादनाचे दर हे आशिया-पॅसिफिक व्यापार कराराच्या दुस-या दुरुस्तीप्रमाणे असणार आहेत. दरम्यान, चीनने दर कपातीसाठी घोषित केलेल्या उत्पादनाच्या यादीत आणखी उत्पादनांचा समावेश करावा विशेषत: माहिती तंत्रज्ञान व औषध निर्माण क्षेत्रासाठी तरतूद करावी यासाठी भारत चीनवर दबाव टाकत आहे.

भारत-चीन यांच्यात एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या बैठकीत धोरणात्मक चर्चा करण्यात आली होती. नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी या चर्चेत भारताकडून चीनला सोयाबीन आणि साखरेची निर्यात संदर्भात बोलणी केली होती. तसेच वुहान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांच्यातील झालेल्या अनौपचारिक परिषदेनंतर दोन्ही देशांमधील तांदूळ, साखर तसेच औषधे, विशेषकरून कॅन्सर आजारावर उपचार करणा-या औषधांची चीनमध्ये निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Leave a Comment