मान्सूनमध्ये हिमाचल मधील या स्थळांना जरूर भेट द्या


हिमाचल प्रदेश म्हटले कि आपल्याला उन्हाळ्याच्या सहलीसाठी जाण्याचे राज्य असे वाटते. मात्र मान्सून मध्येही हिमाचलचे सौंदर्य आणखी खुलते. मान्सून मध्ये हिमाचल मधील हि ठिकाणे आवर्जून पाहायला हवीत अशी आहेत. पर्यटकांना कोणताही सिझन भटकंतीसाठी चालतो. पण ज्यांना पावसाला भटकंतीसाठी फारसा आवडत नाही त्यानाही हिमाचल मधील ही ठिकाणे नक्कीच आवडतील अशी आहेत.


हिमाचल मधील या खास जागा खूप परिचित नाहीत आणि म्हणून त्या अधिक सुंदर आणि आकर्षक आहेत. हिमाचल मधील नारकंडा हे गाव असेच. उंच डोंगरांवर तरंगणारे ढग आणि धूसर वाटणारे पण तरीही सुंदर वातावरण येथे उपभोगायला मिळते. निसर्गाचा वरदहस्त हिमाचलवर आहेच. पण नारकंदचा निसर्ग अधिक सुंदर आणि रम्य आहे. समुद्रसपाटीपासून २७०८ मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण शिवालिक पर्वत रांगात आहे आणि येथील निसर्ग डोळ्यांनी पिऊन घ्यावा असा आहे.


शोघी हे असेच आणखी एक ठिकाण. पाईन आणि ओक वृक्षांची घनदाट जंगलात वसलेले हे गाव. मान्सून मध्ये येथील हवेला वेगळीच खुमारी चढते. जवळच असलेला चॅद्विक धबधबा मुद्दाम पहिलाच पाहिजे असा.


मतियाना हे सिमल्यापासून ४५ किमी वर असलेले गाव सफरचंदाच्या बागा, फुलांची मैदाने, शिवमंदीर यासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील उंच जागेवरून भारत तिबेट हा सापाप्रमाणे वळसे घेत जाणारा रस्ता आणि दऱ्याखोर्याचे सुंदर दर्शन घेता येते.


माशोबारा या ठिकाणी उंच उंच डोंगररांगा आणि घनदाट झाडी मनाला आणि डोळ्यांना शांतता देते. या ठिकाणची हवा अशी आहे कि एकदा येथे गेले कि परत फिरू नये अशी भावना जगते. येथील रिझर्व फॉरेस्ट सँक्च्युरी प्रसिद्ध आहे.


बिलासपुर मान्सून सोबत ज्यांना साहसी पर्यटनाची आवड आहे त्याच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथील गोविंद सागर सरोवर अप्रतिमच. पण पावसाळ्यात त्यात नवी जान भरते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. चारीबाजूनी पसरलेले हिरवेगार डोंगर, हिरवळ आणि मध्ये हा अथांग जलाशय पाहणे म्हणजे काय याचा अनुभव स्वतः घ्यायला हवा.

Leave a Comment