मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतींच्याबद्दल काही रोचक तथ्ये


१८२० सालाच्या शेवटी, भारतामध्ये आलेले ब्रिटीश पुरातत्ववेत्ता चार्ल्स मेसन ह्यांना भटकंती करीत असताना काही प्राचीन अवशेष, मोडकळीस आलेल्या, विशिष्ट प्रकारच्या विटांनी बनविल्या गेलेल्या भिंती दृष्टीस पडल्या. ते अवशेष दृष्टीला पडल्यानंतर साहजिकच त्यांचे कुतूहल जागे झाले. अधिक शोध घेतला असता, हे अवशेष, कालबाह्य झालेल्या हडप्पा शहरातील वास्तूंचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अश्या रीतीने हडप्पा शहराचा शोध प्रथम लागला. त्यानंतर सुमारे तीस वर्षांच्या काळानंतर १८५६ साली काही रेल्वे इंजिनियर्सना रेल्वे मार्ग बनविताना आणखी काही विटा सापडल्या. ह्या विटा तेथून तेव्हा हलविल्या गेल्या असल्या तरी त्यावर रिसर्च मात्र पुष्कळ नंतरच्या काळामध्ये सुरु झाला. १९२०च्या सुमारास पुरातत्ववेत्त्यांनी जिथे ह्या विटा आणि भग्न वस्तूंचे अवशेष सापडले त्या ठिकाणी उत्खननास सुरुवात केल्यानंतर त्यांना हडप्पा आणि मोहेंजोदडो संस्कृतीकालीन अनेक अवशेष सापडले. ह्या अवशेषांमुळे, त्या काळी ह्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे जीवन कसे असावे, ते कश्या प्रकारच्या वस्तू वापरीत असत, तत्कालीन वास्तुकला, इत्यादी गोष्टींवर हळूहळू प्रकाश पडू लागला. अखेरीस अश्या प्रकारे इंडस व्हॅली संस्कृतीचा शोध लागला.

आयआयटी खडकपूर मधील शास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासावरून, मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृती सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचे सिद्ध झाले आहे. ‘नेचर’ नामक प्रसिद्ध जर्नलमध्ये ह्याबद्दल लिहिले गेले असून, मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृती इजिप्शियन किंवा मेसोपोटेमियन संस्कृतीपेक्षाही प्राचीन असल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे. मोहेंजोदडो ह्या शब्दचा शब्दशः अर्थ ‘मृत शरीरांचा ढीग’ असा होतो. येथील ‘ग्रेट बाथ ऑफ मोहेंजोदडो’ ह्या नावाने ओळखले जाणारे सार्वजनिक स्नानगृह, हडप्पन लोक स्वच्छताप्रिय असल्याचे सूचक आहे. ह्या स्नानगृहाच्या चारी बाजूंनी विटांच्या भिंती बांधल्या गेल्या होत्या. ह्यावरून त्या काळी देखील वास्तुकला किती प्रगत होती ह्याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

ह्या ठिकाणी काही अगम्य चिन्हे असलेले शिलालेख, ताम्रपत्रे देखील सापडली आहेत. ह्या चिन्हांचा नेमका अर्थ शोधण्याचा प्रयत्न तज्ञ अजूनही करीत आहेत. इतक्या प्राचीन काळी देखील धान्य साठवून ठेवण्याची पद्धत तत्कालीन लोकांना अवगत असल्याचे हडप्पा मध्ये सापडलेल्या धान्याच्या कोठारांप्रमाणे दिसणाऱ्या वास्तूंवरून सिद्ध होते. अश्या प्रकारची प्राचीन धान्याची कोठारे हडप्पा, मोहेंजोदडो आणि राखीगढी येथे सापडली आहेत. बहुतेक सर्व कोठारे नद्यांच्या जवळपास बांधली गेली असून, नावेमार्गे धान्याची ने-आण करणे सोपे व्हावे असा त्यामागचा हेतू असल्याचे दिसून येते. तसेच धान्याची मळणी करण्यासाठी गोलाकार मोठे दगड आणि उंच कट्टेही येथे सापडले आहेत. लोथल येथे हडप्पा संस्कृतीकालीन बंदर सापडले आहे. हे बंदर साबरमती नदीवर बांधले गेले होते. ह्या बंदरावरूनच सामानाची ने-आण होत असावी.

कालीबंगान ह्या ठिकाणी अनेक यज्ञवेदी सापडल्या असून, तत्कालीन लोक पूजाअर्चा, होमहवन करीत असावेत असा कयास बांधला गेला आहे. तसेच त्या काळी देखील लोक बुद्धिबळ किंवा सारीपाट ह्यांसारखे खेळ खेळत असावेत हे सिद्ध झाले आहे. ह्या खेळांसाठी वापरले जाणारे पट आणि सोंगट्या देखील अवशेषांमध्ये सापडल्या आहेत. हडप्पा शहराची रचना अगदी विचारपूर्वक केली गेली होती. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाले बांधले गेले असून, हे नाले झाकलेले होते. तसेच पाण्याचा पुरवठा करण्यासाठी अनेक विहिरी देखील खोदल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे प्रत्येक घरामध्ये स्नानासाठी खास जागा नियोजित असल्याचे पुरावेही सापडले आहेत. अनेक मंदिरे, महाल, इत्यादी बांधण्यासाठी आवश्यक वास्तुकलेबरोबरच निरनिराळ्या प्रकारची भांडी, हत्यारे आणि दागिने बनविण्याची कला देखील तत्कालीन लोकांना अवगत होती. अनेक तऱ्हेची भांडी, मण्यांच्या माळा अश्या प्रकारच्या अनेक वस्तू उत्खननात सापडल्या आहेत. त्याकाळचे महिला आणि पुरुषही दागिन्यांचा वापर करीत असावेत. त्याचबरोबर अनेक तऱ्हेच्या देव देवतांच्या मूर्तींचे अवशेषही आढळून आले आहेत. ह्यावरून तेव्हा मूर्तीपूजा अस्तित्वात होती असे वाटते. त्या काळी एका वस्तूच्या बदल्यामध्ये दुसरी वस्तू दिली घेतली जात असे, त्यामुळे पैसे किंवा नाण्यांचा वापर होत नसे. तरी वस्तू देताना किंवा घेताना त्या वस्तूचे वजन दर्शविणारी अनेक मापे देखील उत्खनननात सापडली आहेत. त्यावरून वस्तूंचे वजन करण्याचे ज्ञान तत्कालीन लोकांना अवगत असल्याचे लक्षात येते.

इतकी प्रगत संस्कृती अचानक लयाला कशी गेली ह्याचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. तसेच ह्या शहराला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे क्षति पोहोचली असल्याचाही भक्कम पुरावा नाही, किंवा जाळपोळीमुळे, शत्रूने केलेल्या आक्रमणामुळे देखील हे शहर नष्ट झाल्यासारखे दिसत नाही. पण पुरातत्ववेत्त्यांच्या मते, त्याकाळी हडप्पा शहराच्या जीवनरेखा असणाऱ्या इंडस आणि घग्गर नद्यांनी आपले मार्ग बदलल्यामुळे ओढविलेल्या दुष्काळामुळे हे शहर उजाड झाले असावे.

Leave a Comment