ही भारतीय सुपरफुड्स होत आहेत जगभरामध्ये लोकप्रिय


साधारण दोन तीन वर्षांपूर्वी, जगभरातील सुप्रसिद्ध कॅफेज् मधील मेन्यू मध्ये ‘टर्मरिक लाटे’ दिसू लागली होती. अमेरिका आणि युरोपमधील उच्चभ्रू जनता ह्या पेयाचा आस्वाद घेत होते. वनस्पतींपासून निर्मित दुधामध्ये हळद, आणि आले घालून तयार केलेली ही टर्मरिक लाटे चांगलीच लोकप्रिय ठरली होती. पण ही ‘टर्मरिक लाटे’ जगभर लोकप्रिय होण्याआधी भारतामध्ये गेली कित्येक शतके हळद-दुधाचे सेवन घरोघरी केले जात आले आहे. हळदीचा वापर भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कित्येक शतकांपासून होत आला आहे. त्याचप्रमाणे हळद औषधी असल्याने अनेक आजारांवर उपयुक्त आहे. हळद हे आपल्या खाद्य संस्कृतीचे सुपरफुड म्हटले पाहिजे. अशीच अनेक पारंपारिक भारतीय सुपरफुड्स आता जगभरामध्ये लोकप्रिय होत आहेत.

पौष्टिक, आणि आरोग्यासाठी उत्तम आहार असलेल्या खाद्य पदार्थांना सुपर फुड्स म्हटले जाते. पारंपारिक भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक सुपरफुड्स आहेत. त्यामध्ये अनेक पदार्थ आता जगभरामध्ये वापरले जात आहेत आणि लोकप्रिय होत आहेत. नारळाचे तेल, किंवा खोबरेल तेल हे त्यापैकीच एक. केसांचे, त्वचेचे पोषण असो, किंवा जेवणामध्ये वापर असो, खोबरेल तेल ‘ऑल राउंडर’ आहे. त्याचप्रमाणे शेवग्याच्या शेंगा हे देखील सुपरफूड आहे. शेवग्याच्या शेंगांचा वापर जेवणामध्ये होतोच पण त्याशिवाय पाश्चिमात्य देशांमध्ये शेवग्याच्या पानांची ‘स्मूदी’ अतिशय लोकप्रिय हेल्थ ड्रिंक समजली जाते. आजकाल शेवग्याच्या पानाचा काढा, त्यापासून तयार केली गेलेली सप्लिमेन्टस्, पावडर अतिशय लोकप्रिय होत आहे.

‘मखाने’ हा पदार्थ भारतामध्ये, काही दशकांपूर्वी केवळ उत्तर भारतामध्ये आणि बिहार आणि त्याच्या आसपासच्या राज्यांमध्ये पाहायला मिळत असे. पण मखाने अतिशय पौष्टिक, वजन नियंत्रित ठेवण्यास सहायक असल्याने ह्याचा वापर आता भारतभरातच नाही, तर जगभरामध्ये होत आहे. मखन्यामध्ये फॅट आणि सोडियम नाही, आणि ह्यामध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम, झिंक आणि लोह ह्यांचे प्रमाण मुबलक आहे. आवळा हा ही आता सुपरफूड म्हणून जगभरामध्ये लोकप्रिय होत आहे. आवळ्याचा रस औषधी असल्याने ह्याचा वापर होतो आहेच, पण त्याशिवाय आवळकाठी आणि आवळ्याची पूड देखील अनेक सौंदर्य प्रसाधानांमध्ये आणि औषधांमध्ये वापरले जात आहेत.

Leave a Comment