नैराश्य टाळण्यासाठी आहारामध्ये या पदार्थांचा समावेश आवश्यक


मानसिक आरोग्याशी निगडित समस्या दिवसेंदिवस जास्त दिसून येत असून, ह्या समस्यांमध्ये ‘नैराश्य’ किंवा ‘डिप्रेशन’ ही समस्या सर्वात जास्त प्रमाणात आढळून येत आहे. जगभरामध्ये सुमारे ३००,००० व्यक्ती नैराश्याने ग्रासलेल्या आहेत. नैराश्य येणे म्हणजे केवळ स्वतःच्या प्रति किंवा आयुष्याच्या प्रति औदासिन्य इतकेच नव्हे, तर हा एक आजार असून, त्याचे दुष्परिणाम केवळ मानसिकच नाही, तर शाररीक देखील असतात. तज्ञांच्या मते एखादी व्यक्ती जर दोन आठवड्यांच्या पेक्षा जास्त काळ सतत उदास राहिली, तिला कोणत्याही गोष्टीने आनंद मिळत नसला, किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये उत्साह वाटत नसला, आपले आयुष्य संपून जावे अशी भावना वारंवार ती व्यक्ती प्रकट करीत असली, तर त्या व्यक्तीला नैराश्य आले असून, त्यासाठी उपचारांची आवश्यकता असते.

नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तीला सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. तसेच सतत अंग दुखणे, स्नायूंमध्ये क्रँप्स येणे, डोके दुखणे, लहान सहान कारणांवरून चिडचिड होणे, सतत झोप येणे किंवा अजिबात झोप न लागणे, सतत स्वतःला दोष देत राहणे, स्वतःच्या क्षमतेवर सतत शंका घेणे, आत्मविश्वास गमावून बसणे, कोणत्याही गोष्टीत उत्साह न वाटणे, कुठल्याही कामामधे मन एकाग्र न होणे, भूक अति वाढणे, किंवा एकदमच कमी होणे, कोणताही निर्णय न घेता येणे, एकलकोंडेपणा, आयुष्य संपवून टाकावे अशी सतत भावना, अश्या अनेक प्रकारच्या समस्या दिसून येऊ लागतात. ह्या समस्यांचे निवारण करण्यासाठी थेरपी आणि औषधोपचार अशी दुहेरी उपाययोजना अत्यावश्यक असते. ह्यामध्ये योग्य आहार घेतला जाणे हे देखील औषधोपचाराइतकेच महत्वाचे आहे.

त्या दृष्टीने मेडीटेरेनियन डायट नैराश्य कमी करण्याच्या कामी सहायक असल्याचे तज्ञांचे मत आहे. ह्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असलेले पदार्थ, तसेच पालेभाज्या आणि ताज्या फळांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नैराश्य कमी करण्यासाठी शरीराची चयापचय शक्ती संतुलित ठेवणारी, मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले न्यूट्रीयंटस् आणि मायक्रो न्यूट्रीयंटस् पुरविणारी, तसेच पचनसंस्थेतील शरीरासाठी आवश्यक असणारे जीवाणू नष्ट होऊ देता, तसेच कायम ठेवणारी आहारपद्धती आवश्यक आहे. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आहार असण्यासाठी आहारामध्ये ताजी फळे, भाज्या, कडधान्य आणि मुबलक प्रमाणामध्ये अँटी ऑक्सिडंटस् असणारे पदार्थ असावेत. तसेच प्राण्यांपासून मिळणारी प्रथिने आहारामध्ये मर्यादित प्रमाणात असावीत. जवस आणि सुक्यामेव्याचा आहारामध्ये समावेश असावा. तसेच व्यक्ती मांसाहारी असेल, तर आहारामध्ये मासे समाविष्ट असावेत. त्याचप्रमाणे ड जीवनसत्व देखील मुबलक मात्रेमध्ये मिळणे आवश्यक आहे. नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींनी कोणत्याही स्वरूपामध्ये कॅफिन टाळावे. त्यस्क़्थि चहा, कॉफी, कोल्डड्रिंक्स टाळायला हवीत. तसेच आहारातील साखरेचे प्रमाण देखील कमी असणे गरजेचे आहे. ह्या व्यक्तींनी मद्यपान देखील टाळायला हवे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment