जर सतत गोड खावेसे वाटत असेल, तर त्यामागची कारणे कोणती?


आपल्या सर्वांनाच आपले आवडते पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा अधून मधून होत असते. तसेच काहींना सतत काहीतरी गोड खाण्याची अतिशय तीव्र इच्छा होत असते. केवळ गोड पदार्थ खाण्याची मनापासून आवड हे एकमेव कारण ह्यामागे नाही. सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल, तर शरीरातील सेरोटोनीन, कॉर्टीसोल, आणि इस्ट्रोजेन ह्या आपल्या शरीरातील हार्मोन्सच्या पातळी असंतुलित असल्याचे हे लक्षण आहे. जेव्हा शरीरामध्ये हार्मोन्सच्या पातळी असंतुलित होतात, तेव्हा सतत गोड खाण्याची इच्छा अनावर होऊ लागते. ह्या हार्मोन्सच्या पातळी असंतुलित होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.

जर एखादी व्यक्ती जास्त काळापासून आहारातील कर्बोदके वर्ज्य करीत असेल, म्हणजेच ‘लो-कार्ब’ डायटचे पालन करीत असेल, तर ह्यामुळे सुरुवातीला वजन कमी होताना दिसले, तरी कालांतराने थकवा जाणाविणे, अशक्तपणा, ह्यामुळे सतत गोड खाण्याची इच्छा अनावर होऊ लागते. त्यामुळे आहारातून कर्बोदके संपूर्णपणे वर्ज्य करण्याऐवजी मर्यादित प्रमाणात का होईना, पण फायबरचे प्रमाण जास्त असलेल्या कर्बोदकांचे सेवन करणे आवश्यक ठरते. ह्यामुळे ब्लड ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते, व वारंवार भूक लागत नाही.

दर महिन्याला मासिक पाळी सुरु होण्यापूर्वी काही महिलांना गोड खाण्याची तीव्र इच्छा होत असते. शरीरातील हार्मोन्सची पातळी कमी जास्त होत असणे, हे त्यामागचे कारण आहे. जसजसे शरीरामध्ये कॉर्टीसोल वाढते, तसतसे सेरोटोनिनची पातळी कमी होते. सेरोटोनीन कमी झाले, की गोड खाण्याची इच्छा होऊ लागते. ह्या बाबतीत केल्या गेलेल्या संशोधनामध्ये मासिक पाळी सुरु होण्यापूर्वी महिलांच्या आहारामध्ये एक हजार कॅलरीजने वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. जर ह्या दिवसांमध्ये महिलांनी फायबर जास्त प्रमाणात असलेले पदार्थ खाल्ले, तर शरीरातील सेरोटोनीनची पातळी संतुलित राहते आणि त्यामुळे सतत गोड खाण्याची इच्छा नियंत्रित राहते.

जेव्हा एखादी व्यक्ती मानसिक तणावाखाली असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कॉर्टीसोलची पातळी वाढू लागते. परिणामी आहारामध्ये साखर वाढते, गोड पदार्थ खाण्याची इच्छा अनावर होऊ लागतो. किंबहुना ज्या महिलांमध्ये मानसिक तणाव जास्त आढळतो, त्यांच्या आहारामध्ये गोडाचे प्रमाण जास्त असून, परिणामी त्यांचे वजनही वाढू लागते. तसेच जर निद्रानाशाचा विकार असेल, शरीराला आवश्यक तितकी विश्रांती मिळत नसेल, तर त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळेही गोड पदार्थ खाण्याची सतत इच्छा होऊ लागते. अश्या वेळी आपल्या शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळेल ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment