कोण होते भय्यूजी महाराज


उदयसिंग देशमुख असे ५० वर्षीय भय्यूजी महाराज यांचे मूळ नाव. मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी त्यांचा जन्म २९ एप्रिल १९६८ मध्ये झाला होता. गेली १७ वर्षाहून अधिक काळ ते सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यात सक्रिय होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच सामाजिक जीवनातून आपण निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. देशातील मोठ्या राजकीय नेत्यांचे ते राजकीय गुरू राहिलेले आहेत. ते काँग्रेस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात.

आपल्या करिअरची फॅशन डिझायनर म्हणून सुरूवात करणारे भय्यूजी महाराज नंतर अध्यात्माकडे वळले. २०१५ मध्ये भय्यूजी महाराजांची पहिली पत्नी माधवीचे निधन झाले आहे. माधवीपासून झालेली कुहू ही त्यांची मुलगी पुण्यात शिक्षण घेत आहे. ३० एप्रिल २०१७ रोजी डॉक्टर आयुषीसोबत भय्युजी महाराजांचे दुसरे लग्न झाले. आयुषीचे कुटुंब शिवपुरीचे असून त्यांनी पीएचडी केली आहे. कौटुंबिक सदस्यांच्या माध्यमातून आयुषी भैय्युजी महाराजांना भेटली. भय्युजी महाराजांची आई व बहिणीच्या आग्रहास्तव दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.

मध्यंतरी भय्यूजी महाराज बरेच चर्चेत आले होते. तत्कालिन युपीए सरकार विरुद्ध लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी देशव्यापी आंदोलन छेडले होते. अण्णा तेव्हा दिल्लीत उपोषणासाठी बसले होते. युपीए सरकारने त्यावेळी भय्यूजी महाराजांना दूत म्हणून अण्णांशी बोलणी करण्यासाठी पाठवले होते. अण्णांनी भय्यूजी महाराज यांच्यासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर ज्युस घेऊन आंदोलन मागे घेतले होते. २०१२ च्या सद्भावना उपवास दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी गुजरातला बोलवले होते.

Leave a Comment