चार शतकांपासून उभ्या ‘चार-मिनार’चे बांधकाम आजही भक्कम


हैद्राबाद शहराची खासियत असलेली आणि भारतातील अतिशय भव्य इमारतींपैकी एक आहे चार-मिनार. ह्या इमारतीचे निर्माण १५९१ साली मोहम्मद कुली कुतब शाह, ह्या कुतब शाहीच्या पाचव्या सम्राटांनी करविले होते. हैद्राबादची स्थापना देखील ह्यांच्याच अधिपत्याखाली झाली. गेली चार दशके ही इमारत मोठ्या डौलाने उभी असून, हैद्राबादमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे.

ह्या इमारतीवरील अनेक गच्च्या आणि झरोके चारमिनारची खासियत आहेत. ह्यावरील फुलांच्या विविध आकारांतील कोरीव काम मुघल आणि हिंदुस्तानी स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. हजारो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या हा इमारतीने आपल्या वास्तुकलेमुळे शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. ह्यामागचे मुख्य कारण हे, की चार दशके उलटून गेल्यानंतर, उन्हाचे, वाऱ्याचे, कोसळणाऱ्या पावसाचे, आसपासच्या प्रदूषणाचे आघात सहन करूनही आजतागायत ह्या इमारतीचे बांधकाम अगदी पहिल्यासारखेच भक्कम राहिले आहे. ह्या इमारतीची कुठेही मोडतोड झालेली दिसत नाही, किंवा कुठे ही लहान मोठे तडे गेलेले पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे हे इमारत इतकी प्राचीन असूनही इतकी भक्कम कशी राहिली हा शास्त्रज्ञांसाठी कुतूहलाचा विषय होता.

तामिळनाडू येथील वेल्लोर इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी येथील शास्त्रज्ञांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या मदतीने चारमिनारच्या बांधकामामध्ये कोणते साहित्य वापरले गेले असावे, हे शोधून काढण्यात यश मिळविले आहे. ह्या शोधानुसार ही इमारत इतके दिवस भक्कम राहिल्याचे कारण ‘लाईम मॉर्टर’ चा वापर, हे आहे. लाईम मॉर्टर, कॅल्शियम ऑक्साईड, वाळू आणि पाण्याच्या मिश्रणापासून बनविला जातो. जेव्हा ह्या पदार्थाचा संपर्क हवेशी होतो, तेव्हा हवेतील कार्बन डाय ऑक्साइड मुळे ह्याचे रूपांतर कॅल्शियम कार्बोनेट मध्ये होते. ह्या प्रक्रियेला कार्बोनेशन म्हटले जाते. जितके कार्बोनेशन कमी, तितका इमारतीला भक्कमपणा जास्त हे त्याकाळी देखील वास्तुकलाविशारदांना ठाऊक होते. त्यामुळे चार मिनार बनविताना वापरलेल्या गेलेल्या साहित्यामध्ये ‘फर्मेंटेड प्लांट एक्सट्रॅक्टस्’ वापरली असावीत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. म्हणजेच झाडांपासून तत्वे मिळवून, ती सडवून लाईम मॉर्टरमध्ये वापरली गेली असल्याने कार्बोनेशनच्या प्रक्रियेचा वेग आपोपाप मंदावला, आणि म्हणून, इतकी शतके उलटून गेल्यानंतरही चार-मिनारची इमारत अतिशय भक्कम राहिली.

Leave a Comment