बासमती खेरीज ‘या’ सुवासिक तांदुळांच्या व्हरायटी आजमावून पहा


पुलाव, बिर्यानी, मसालेभात आणि तत्सम भाताचे अनेक चविष्ट प्रकार बनविण्यासाठी बासमती किंवा मोगरा ह्या व्हरायटीचे तांदूळ वापरले जातात. हे तांदूळ शिजत असतानाच घरामध्ये ह्यांचा मंद सुवास दरवळत असतो. शिजविलेल्या भाताच्या भांड्यावरील झाकण बाजूला करताच, ह्या तांदुळाच्या सुवासाने भात-प्रेमी लोक हुरळून जातात. बाजारातून तांदूळ विकत घेताना त्याच्या दाण्याच्या आकारासोबत त्याचा वास ही हटकून पहिला जातो. सुवासाच्या बाबतीत बोलयाचे झाले, तर बासमती, मोगरा ह्या व्हरायटी सरस आहेतच पण त्यांच्याशिवाय ही अनेक प्रांतांतील तांदुळाच्या निरनिराळ्या व्हरायटी आहेत, ज्या तांदूळ प्रेमींनी अवश्य आजमावून पाहायला हव्यात.

विशेष करून महाराष्ट्र प्रांतामध्ये जास्त पाहायला होणारा ‘आंबेमोहोर’ हा तांदूळ अतिशय सुवासिक आहे. ह्याच्या दाण्याचा आकार काहीसा गोलाकार आणि लहान असतो. हा तांदूळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आंबेमोहोर ह्या जातीमध्ये ‘मुळशी आंबेमोहो’र जास्त पसंत केला जातो. अतिशय उत्तम सुवासाचा, पण काहीशा निराळ्या चवीचा ‘मुल्लन काझ्मा’ हा तांदूळ केरळ मधील वायनाड भागामध्ये होत असून ह्याचा वापर पायसम, किंवा मलबार बिर्यानी बनविण्यासाठी वापर होतो. हा तांदूळ शेतात पिकत असतानाही ह्याचा सुवास जाणविल्यावाचून राहत नाही. केरळ मधील काही मोजकेच शेतकरी हा तांदूळ पिकवितात.

पश्चिम बंगालच्या प्रांतामध्ये होणारा ‘गोबिंदो भोग’ हा तांदूळ अतिशय सुवासिक असून, जन्माष्टमीच्या दिवशी भगवान कृष्णासाठी खिरीचा प्रसाद बनविण्यासाठी वापरला जातो. ह्या तांदळाची खीर किंवा ‘पायेश’ अतिशय चविष्ट बनते. बंगालमध्ये सणावारांच्या दिवशी, किंवा विशेष मेजवान्यांसाठी ह्या तांदुळाचा वपर आवर्जून केला जातो. ‘सीरागा सांबा’ ह्या तांदुळाची व्हरायटी तमिळ नाडू प्रांताची खासियत आहे. ह्या तांदुळाचे दाणे अतिशय नाजूक दिसतात. विशेष मेजवान्यांच्या प्रसंगी पुलाव बनविण्यासाठी ह्या तांदुळाचा उपयोग केला जातो. ह्या प्रांताची खासियत असणाऱ्या दिंडीगुल बिर्यानी आणि अम्बर बिर्यानी बनविण्यासाठी ही ह्याचा तांदळाचा वापर होतो.

‘मश्क बुद्जी’ ह्या जातीचा तांदूळ काश्मीर भागामध्ये होत असून, ह्याचा दाणा काहीसा जाडसर असतो. खास समारंभ असल्यास, विशेषतः विवाह प्रसंगी आयोजित मेजवान्यांमध्ये हा तांदूळ आवर्जून वापरला जात असे. पण आता ह्या तांदुळाची शेती येथे फार कमी प्रमाणात होते. ‘राधुनी पागोल’ ह्या शब्दांचा सरळ अर्थ ‘रांधणाऱ्याला वेड लावणारा’ असा आहे. म्हणजेच ह्या तांदुळाचा सुवास इतका मोहक आहे, की तो तांदूळ शिजविणारा देखील ह्या वासाचा ‘दिवाना’ होऊन जातो असे म्हणतात. पश्चिम बंगाल मध्ये अतिशय प्रसिद्ध पण ह्या प्रांताबाहेरील लोकांना फारसा परिचयाचा नसणारा हा तांदूळ आहे. ‘चक हाओ अमुबी’ हा काळा दिसणारा, जरा चिकटसर असणारा तांदूळ आहे. हा तांदूळ अतिशय सुवासिक असून, मणिपूरची खासियत आहे. ह्याची चव काहीशी गोडसर असते. येथे खीर बनविण्यासाठी ह्या तांदुळाचा वापर करण्यात येतो.

Leave a Comment