दिवसभराच्या कामात असे राहा सजग आणि सक्रीय


कामाच्या गडबडीत असताना, डेडलाईन्स पूर्ण करायच्या धांदलीत आलेला शारीरिक थकवा आणि डोळ्यांवरची झोप घालाविण्याकरिता एका मागून एक अनेक चहा किंवा कॉफीचे कप रिकामे करणारे लोक आपण अनेकदा पाहतो. तर कधी तरी मीटिंग चालू असताना जांभया आवरणे कठीण होऊन जाते. अश्या वेळी सर्वांच्या चमत्कारिक नजरांचा सामना करावा लागतो. ऑफिसच्या वेळामध्ये इतका शारीरिक थकवा जाणविण्याचे, इतकी झोप येण्याचे नेमके कारण काय असू शकते?

प्रत्येकाच्या शरीराचे स्वतःचे असे एक ‘बॉडी क्लॉक’ असते. काम करण्याची वेळ कुठली आणि विश्रांतीची वेळ कुठली हे प्रत्येकाचे बॉडी क्लॉक ठरवीत असते. ह्या दोन्ही वेळांमध्ये जर गडबड झाली, तर हे बॉडी क्लॉक गोंधळते. म्हणजेच ज्या वेळी शरीराची विश्रांती घेण्याची वेळ आहे, त्यावेळी जर एखादी व्यक्ती काम करीत राहिली, तर ज्या वेळी शरीराची काम करण्याची वेळ असेल त्यावेळी शरीर थकलेले असेल. म्हणूनच विश्रांतीच्या वेळी काम करीत राहिले, तर कामाच्या वेळी मेंदू सजग न राहता झोप येऊ लागते, थकवा जाणवू लागतो. ह्यामुळे कामांमध्ये चुका होण्याचा संभव अधिक असतो.

ज्या वेळी मेंदू सजग राहायला हवा, त्यावेळी जर झोप अनावर होत असेल, थकवा जाणवत असेल, तर तुमच्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता असल्याचे ते लक्षण आहे. अश्यावेळी झोप, आळस घालविण्यासाठी आणि मेंदू सक्रीय, सजग ठेवण्यासाठी चहा-कॉफीचा भडीमार करीत राहणे, आणखीनच अपायकारक ठरू शकते आणि त्यामुळे अॅसीडीटी सारखे विकार बळावू लागतात.हे होऊ नये ह्याकरिता आपल्या बॉडी क्लॉक कडे लक्ष देणे आवश्यक आहे. रात्रीची नियमित आठ तासांची झोप, ह्या करिता आवश्यक आहे.

शांत झोप लागण्यासाठी आपला टीव्ही, मोबाईल फोन, लॅपटॉप झोपेच्या वेळेच्या अर्धा तास आधी बंद करावेत. तसेच झोपण्यापूर्वी धुम्रपान, मद्यपान, चहा, कॉफी, किंवा कोल्डड्रिंक्सचे सेवन अवश्य टाळावे. रात्रीचे जेवण झोपण्याच्या वेळेच्या किमान तीन तास आधी झालेले असावे. ह्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. झोपण्याच्या खोलीमध्ये प्रखर प्रकाश नसावा. तसेच झोपण्यापूर्वी मन शांत करण्यासाठी ध्यानधारणा करावी, हलके संगीत ऐकावे, किंवा आपले आवडते पुस्तक वाचावे. शरीराला आवश्यक तेवाशी विश्रांती मिळाली, तर कामाच्या वेळी मेंदू आपओपापाच सजग, सक्रीय राहील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment