या आहेत जगातील सर्वात किंमती प्रॉपर्टीज्…


भारताची मायानगरी- मुंबई.. आपल्या आयुष्याचे भले व्हावे, ह्या विचाराने दररोज हजारोंच्या संख्येने लोक इतर शहरांमधून मुंबईच्या दिशेने येत असतात. बॉलीवूडची झगमगती दुनिया हे ह्या शहराचे विशेष आकर्षण. पण मुंबईमध्ये येऊन स्थायिक होणे हे बिकट काम आहे, कारण ह्या शहरामध्ये सर्वात महाग कोणती वस्तू असेल, तर ती म्हणजे राहण्यासाठी जागा. आपल्या देशामध्ये कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या अनेक प्रॉपर्टीज आहेत. ह्या महागड्या प्रॉपर्टीजमध्ये मुंबई मधील चार सदनिकांचा देखील समावेश आहे.

ह्या चार सदनिकांची किंमत २४० कोटी रुपये असून, मुंबईतील नेपियन सी रोडवरील एका प्रोजेक्टमधील २८ व्या ते ३१ व्या मजल्यांच्या दरम्यान असलेले हे चार फ्लॅट तब्बल २४० कोटी रुपयांमध्ये विकले गेले आहेत. इथे सदनिकेच्या एका चौरस फुटाची किंमत तब्बल १.२५ लाख रुपये इतकी आहे ! याचाच अर्थ असा, की आपल्याला चपलांची जोडी ठेवण्यासाठी जितकी जागा लागते, तितकी जागा इथे घ्यायची असली, तर त्यासाठी १.२५ लाख रुपये किंमत मोजावी लागणार. तसेच मुंबई मध्ये असणारे, मुकेश अंबानी ह्यांचे निवासस्थान ‘अँटीला’ हे देखील भारतातीलच काय, तर जगातील सर्वात महाग प्रॉपर्टींपैकी एक आहे. चार लाख चौरस फुट विस्तार असलेल्या ह्या वास्तूची किंमत दहा हजार कोटींच्या घरात आहे. ह्या भव्य इमारतीला सत्तावीस मजले असून, ह्यांपैकी सहा मजले केवळ पार्किंगसाठी आहेत, तसेच येथे हेलिपॅड देखील आहेत. जगातील सर्व अद्ययावत सुखसोयी ह्या घरामध्ये आहेत. जगामध्ये इतरत्र देखील अश्या अनेक प्रचंड किंमती प्रॉपर्टीज् आहेत.

अमरिकेतील लॉस अँजीलीस जवळील सेंट गॅब्रियेल पर्वतराजीच्या सान्निध्यात असलेले ‘नील नियमिया बे एअर स्पेस होम’ हे घरही जगातील सर्वात महागड्या प्रॉपर्टीज् पैकी एक आहे. हेलिपॅड, तरणतलाव, कसिनो पासून ते इतर सर्व प्रकारच्या सुखसोयींनी हे घर परिपूर्ण आहे. पाचशे मिलियन डॉलर्स किंमत असलेले घर अतिशय सुंदर लोकेशनवर बनविले गेले आहे. तीस दालने असलेले हे घर अतिशय प्रशस्त असून ह्या भूखंडावर आणखी ही तीन लहान घरे बनविली गेली आहेत. देश-विदेशामध्ये प्रसिद्ध असणारे डिझायनर पियेर कार्दिन ह्यांच्या मालकीचे असलेले ‘ले पेतील्स बुलाल्स’ हे अलिशान घर ४५५ मिलियन डॉलर्सचे आहे. हे घर एखाद्या लक्झरी रोसोर्ट प्रमाणे भासत असून, अनेक हॉलीवूड चित्रपट येथे चित्रित करण्यात आले आहेत.

मोनॅको येथील ‘टूर ड ओदेन’ ही सदनिका जगातील सर्वात महाग सदनिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ५६० फुटांच्या उंचीवर असलेली ही अपार्टमेंट ३३० मिलियन डॉलर्स किंमतीची आहे. तसेच ‘१८ कार्लटन हाऊस टेरेस’ हे लंडनमधील निवासस्थान तेथील सर्वात मोठ्या आणि महाग निवासांपैकी एक आहे. ह्या निवासस्थानाला सहा मजले असून, अनेक दालने असलेल्या ह्या घरामध्ये एका फुटबॉल फील्ड इतकी मोठी बैठकीची खोली आहे. १८९० साली निर्माण केली गेलेली ही वास्तू अतिशय भव्य आहे. ‘२०, सेन्ट्रल पार्क साऊथ पेंटहाउस’ हे निवासस्थान अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आहे. १६ शयन कक्ष, १७ बाथरूम्स, ५ बाल्कनी आणि भले मोठे टेरेस असलेले हे निवासस्थान न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन ह्या आलिशान भागामध्ये आहे. २३,००० चौरस फुटांच्या ह्या वास्तूमधून सेन्ट्रल पार्क चे सुंदर दृश्य नजरेला पडत असते. कॅलिफोर्निया येथील ‘प्ले बॉय मॅन्शन’ हे ही जगातील सर्वात अधिक किंमत असलेल्या मालमत्तांपैकी एक आहे.

Leave a Comment