सातासमुद्रापार चालल्या कैद्यांनी बनवलेल्या चपला !


पुणे : आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांनी आपल्या हातांनी बनवलेल्या कलाकुसरीच्या चपला आता सातासमुद्रापार जाणार आहेत. कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने राबवलेल्या नवनवीन प्रयोगातून कैद्यांची ही कला या माध्यमातून जगासमोर येत आहे.

सध्या जगभरात या चकचकीत चपला आणि बूट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असणाऱ्या कैदी कारागिरांच्या हातांनी या सुंदर चपला बनवल्या आहेत. मुंबईतील तरुण उद्योजक दिवेज मेहता यांनी येरवडा कारागृहातील कैद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कारागृहाच्या साथीने ५५ कैद्यांना चपला बूट बनवण्याचं ट्रेनिंग दिल्यामुळे सरकारलाही चांगलाच फायदा होत आहे.

दिवेज मेहतांनी कैद्यांनी तयार केलेल्या चपला मोठ मोठे मॉल्स आणि शोरूम्समध्ये इनमेंट या ब्रँड खाली विक्रीला ठेवल्या आहेत. अगदी परदेशातूनही त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या यशस्वी प्रयोगानंतर आता कोल्हापूर कारागृहातील कैद्यांनाही प्रशिक्षण देऊन कोल्हापुरी चप्पल आंतराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा विचार आहे. या उपक्रमामुळे कैद्यांना प्रचंड आत्मविश्वासाबरोबर कारागृहातून सुटल्यावर सन्मानाने जगण्याचे साधनही मिळणार आहे.

Leave a Comment