शारीरिक आणि मानसिक थकव्याची ही आहेत लक्षणे


दिवसभरातील ऑफिसमधील काम, घरी आल्यानंतर घरातील कामे, अकस्मात पाहुण्यांचे येणे जाणे, मुलांच्या आणि इतर परिवाराच्या जबाबदाऱ्या, या सर्व गोष्टींमुळे शारीरिक थकवा तर येतोच, शिवाय मानसिक तणाव ही जास्त वाढू लागतो. हे तणाव जर वाढत गेले तर ह्याचे परिमार्जन नैराश्यात होऊ शकते. शारीरिक थकव्याची लक्षणे जरी त्वरित जाणवत असली, तरी मानसिक थकव्याची लक्षणे लगेच लक्षात येत नाहीत. त्यामुळे कधी तरी अचानक मनावरला ताण सहन होईनासा होतो. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकव्याची लक्षणे वेळीच ओळखून त्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक ठरते.

कधी तरी एखादी साधीशीच गोष्ट घडते, पण त्यावरून देखील आपल्या संतापाचा उद्रेक होतो. मागून आपल्याला त्या गोष्टीचे वाईटही वाटते. ह्या अचानक येणाऱ्या रागाचा, आपल्या मनावरील तणावाशी, शारीरिक थकव्याशी थेट संबंध आहे. जेव्हा आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरु असते, तेव्हा शरीरावर आणि मनावर जास्त तणाव नसतो. मात्र आपल्या आयुष्यामध्ये काही कारणाने झालेल्या लहान-मोठ्या बदलांशी, किंवा घटनांशी जुळवून घेता आले नाही की मग चिडचिड सुरु होते. हा ताण जर सतत आपल्या मनावर असेल तर तो कमी कसा करता येईल ते पाहावे. मुख्य म्हणजे आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांवर, आपल्या आयुष्यामध्ये होणाऱ्या बदलांवर नियंत्रण मिळविणे शक्य नसेल, तर ह्यांचा मोकळ्या मनाने स्वीकार करण्याची तयारी ठेवावी.

जर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीतून समाधान मिळत नसेल, कोणत्याही गोष्टींचे ‘मोटिव्हेशन’ नसेल, तर ह्यामुळे मानसिक नैराश्य येऊ शकते. अति शारीरिक थकवा देखील ह्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. तसेच कामाचा किंवा इतर जबाबदाऱ्यांचा ताण मनावर असेल, तर त्यानेही मानसिक थकवा येऊ शकतो. ह्या जबाबदाऱ्या पार पाडताना झालेली धावपळ शारीरिक थकव्याला कारणीभूत ठरत असते.
अपुरी झोप देखील शारीरक आणि मानसिक तणावाला कारणीभूत ठरू शकते. अति झोप येणे आणि अजिबात झोप न येणे ही दोन्ही शारीरिक आणि मानसिक थकव्याची लक्षणे आहेत. सतत प्रवास करावा लागल्याने देखील सर्व वेळापत्रक बिघडते. ह्याचा थेट परिणाम झोपेवरही होतो. झोपेचे वेळापत्रक बिघडले, तर शारीरिक आणि मानसिक थकवा येण्यास वेळ लागत नाही.

लहान सहान गोष्टींवरून जर चिडचिड सुरु झाली, तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची आवश्यकता आहे हे ओळखावे. तरुण वयातील व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक थकवा आला असेल, तर त्याचा परिणाम चिडचिड होण्यात होतो, तर वयस्क व्यक्तींच्या बाबतीत शारीरिक आणि मानसिक थकवा उदासीनतेच्या रुपात समोर येत असल्याचे मनोवैज्ञानिक म्हणतात. कोणत्याही कारणाने मनावर आणि शरीरावर ताण असह्य झाला, की त्याचे परिमार्जन रागात, नैराश्यात होऊ लागते. आपल्या मनावर असलेल्या ताणाविषयी कोणाशी संवाद न साधू शकल्याने हा ताण कमीही होत नाही. त्यामुळे लहान लहान कारणांवरून राग अनावर होतो.

मानसिक ताण किंवा शारीरिक थकवा आल्याचे आणखी एक महत्वाचे लक्षण म्हणजे भूक जास्त लागणे, किंवा भूक एकदमच कमी होणे, ह्या दोन्ही गोष्टी मानसिक तणावाशी निगडीत आहेत. तसेच ह्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलनही बिघडते. शारीरिक थकवा आल्यास त्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याकरिता भरपूर विश्रांती, योग्य आहार आणि हलका फुलका व्यायाम ह्यांच्या मदतीने शारीरिक थकवा दूर करता येतो. मानसिक तणाव कमी व्हावा ह्याकरिता मात्र प्रयत्नपूर्वक उपाय करावे लागतात. आपल्या मनावरील तणावाविषयी तज्ञांशी बोलणे श्रेयस्कर ठरते. अनेकदा ह्या विषयी मित्र-मैत्रिणींशी, किंवा परिवारातील कोणाशी तरी चर्चा केली जाते. पण बहुतेकवेळी, त्यांनी निरनिराळी मते व्यक्त केल्याने तुमच्या मनाचा आणखी गोंधळ उडतो, आणि परिणामी तणाव आणखी वाढतो. म्हणून जर आवश्यकता वाटली, तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. मनावरील तणावाची नेमकी कारणे जाणून घेऊन, तणाव कोणत्या प्रकारे कमी करता येईल ह्याचे योग्य मार्गदर्शन तज्ञ करू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment