मायग्रेनचा त्रास कमी करण्याकरिता आहारातून हे पदार्थ वगळा


मायग्रेनमुळे एकदा का डोकेदुखी सुरु झाली, की ही डोकेदुखी इतर काही सुचू देत नाही. या डोकेदुखीमुळे ना काम सुचते, ना आराम. जर ही डोकेदुखी दोन दिवसांपेक्षा अधिक काळ सुरु राहिली, तर मात्र घरगुती उपाय न करीत बसता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ह्या डोकेदुखी साठ औषधोपचार तर झालेच, पण आहारातून काही ठराविक पदार्थ वगळल्याने देखील पुष्कळ आराम पडत असल्याचे दिसून आल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी, मळमळ त्रास देत असल्यास काही पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य करणे उपयुक्त ठरू शकते.

२०१६ साली केल्या गेलेल्या एका रिसर्चनुसार, ज्यांना मायग्रेनमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल, किंवा उलट्या, मळमळ अश्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल, त्यांनीं आपल्या आहारातून कॉफी आणि नायट्राइट्सचे प्रमाण जास्त असलेले प्रोसेस्ड अन्नपदार्थ वर्ज्य करावेत. तसेच ज्या पदार्थांमध्ये मोनो सोडियम ग्लुटामेट, म्हणजेच अजिनोमोटोचे असेल, असे पदार्थ वर्ज्य करावेत. ह्यामुळे मायग्रेनमुळे उद्भविणारी डोकेदुखी पुष्कळ अंशी कमी होत असल्याचे दिसून आल्याचे तज्ञांचे मत आहे. तसेच मद्याचे सेवनही वर्ज्य करावे. त्याऐवजी पाण्याची आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असलेले अन्नपदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करावेत. ह्यामध्ये कलिंगडाचा समावेश आहे.

आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यानेही डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे पाण्याची मात्रा मुबलक असलेली फळे, आणि भाज्या आहारामध्ये असाव्यात. ह्यामध्ये काकडी, कलिंगड, खरबुजे, केळी, टोमाटो ह्या पदार्थांचा समावेश अवश्य असावा, तसेच सूप्स, ताक, लिंबाचे सरबत, पाणी ह्यांचे ही सेवन वरचेवर करीत रहावे. जर आपण घेत असलेल्या आहारामध्ये कर्बोदके कमी असतील, तर शरीरातील ग्लायकोजेनची पातळी कमी होऊन शरीर डीहायड्रेट होऊ लागते. त्यामुळे डोकेदुखी उद्भवू शकते. ही डोकेदुखी कमी करण्यासाठी कर्बोदके जास्त असलेला एखादा पदार्थ खावा, त्यामुळे शरीरातील सेरोटोनीनची पातळी वाढून, डोकेदुखी कमी होते. सेरोटोनीन हा ‘फील गुड’ हार्मोन आहे.

मायग्रेनमुळे उद्भविलेली डोकेदुखी कमी करण्यासाठी सुकी अंजीरे, अवोकाडो, काजू, आणि ब्राऊन राइस ह्या पदार्थांचे सेवन केल्यास लाभ होतो. तसेच हिरव्या पालेभाज्या, लो-फॅट दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, आणि कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानेही मायग्रेनमुळे होणारा डोकेदुखीचा त्रास कमी होतो. काही महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मायग्रेनचा त्रास होतो. त्या दिवसांमध्ये आपल्या आहारामध्ये तिळाचा समावेश करावा. तिळाच्या सेवनाने शरीराला ई जीवनसत्व मिळून शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी स्थिरावते, आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होत नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment