मजबूत नखांसाठी आहार


तसा आपण आपल्या नखांचा फार विचार करीत नाही पण काही लोक नखांना फार जपत असतात. कारण नख हाही त्यांच्या दृष्टीने सौंदर्याचाच एक भाग असतो. नखे सुंदर असली पाहिजेत आणि त्यावर नाना प्रकारची डिझाइन्स काढली पाहिजेत असा काहींचा प्रयत्न असतो पण नखे केवळ सुंदर असून भागत नाही. ती निरोगी आणि मजबूतही असली पाहिजेत कारण मजबूत नखेच सुंदर असतात. नखांचे सौंदर्य आणि मजबुती ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ते जसे आनुवंशिक असते तसेच आहारावरही अवलंबून असते. माणसाचे आरोग्य हे नखांच्या रंगावरून ओळखले जाते. लाल आणि गुलाबी नखे ही निरोगी समजली जातात तर हिरवट आणि निळी नखे ही आहारातल्या पोषक तत्त्वांच्या अभावाची द्योतक असतात. म्हणून नखांच्या सौंदर्यासाठी खालील आहार आवश्यक मानला जात असतो.

आहारात जितकी फळे जास्त असतील तितकी नखे सुंदर आणि मजबूत होत असतात. विशेषत: केळी आणि स्ट्रॉबेरी ही क जीवनसत्त्वांनी युक्त फळे नखांना पोषक ठरत असतात. साधारणत: हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात हे तर सगळेच आहार तज्ज्ञ सांगतच असतात पण ज्या पालेभाज्यांचा रंग गडद हिरवा असेल त्या पालेभाज्या नखांच्या सौंदर्याला उपयुक्त ठरत असतात. कारण अशा पालेभाज्यांतून लोह, फोलेट आणि कॅल्शीयम यांचा पुरवठा होत असतो आणि ही द्रव्ये नखांना उपयुक्त ठरतात. या द्रव्यांमुळे नखांची वाढ वेगाने होत असते.

नखांसाठी अंडी फार उपयुक्त असतात. काही लोकांचे नख फार पातळ असतात. त्यांना अंड्यांमुळे दृढता येते. अंड्यांसोबतच द्विदल धान्ये, उसळी यांचेही सेवन केले तर नखांना पोषक द्रव्ये प्राप्त होेतात. डाळी आणि उसळींना तर नखांच्या पोषक द्रव्यांचे भांडार मानले जाते. त्यांच्यामुळे नख लांब होण्यास मदत होते. रताळे आणि टोमॅटो हीही नखांना फार ़उपयुक्त ठरतात. कारण टोमॅटोत क जीवनसत्त्व जास्त असते तर रताळ्यात अ जीवनसत्त्च विपुलतेने असते. या दोघांतून रोग प्रतिकारक गुणधर्म वाढतात आणि नखांना संजीवनी देतात. त्याशिवाय बी १२ जीवनसत्त्व, ओमेगा ३, जीवनसत्त्व ब ६ यांचा समावेश असलेले अन्नपदार्थ आपल्या आहारात अधिक प्रमाणात रहावेत याची काळजी घेतली तर नखांचे आरोग्य चांगले सांभाळले जाते. बदाम, मणुका यांचा त्या दृष्टीने विचार केला गेला पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही