दहशतवादी कट उघड


मोदी सरकारचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे सत्तरी ओलांडलेले अनुभवी सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांनी काही काळ पाकिस्तानात राहूनही कामाचा अनुभव घेतलेला असल्याने गेल्या तीन चार वर्षात पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारताच्या एकाही शहरात दहशतवादी कारवाया करता आलेल्या नाहीत. या काळात भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी जवानांच्या कारवाया वाढल्या हे खरे आहे पण त्यांना आणि दहशतवादी संघटनांना भारतात अंतर्गत भागात काही करता आलेले नाही. भारतात दहशतवादी कारवायांना फूस देणार्‍या दाऊद इब्राहिमसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दहशतवाद्याला त्यामुळे अस्वस्थता वाटत असणारच.

बराच कालावधी उलटल्यानंतर त्याने आता भारतात काही तरी करण्याच्या योजना आखायला सुरूवात केली आहे. त्याच्या या योजनेची झलक काल मुंबईतल्या पोलिसांना दिसली. भारतात मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या अतिरेकी कारवाईसारखी कारवाई करण्याचे त्याचे प्रयत्न जारी आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या फाझल मिर्झा या मुंबईतल्या तरुणाला काल पोलिसांनी अटक केली असून त्याच्या तपासातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याने २००८ सालच्या हल्ल्यासारखाच हल्ला मुंबईवर करण्याची योजना आखली होती. त्यासाठी त्याला पाकिस्तानातून मदत मिळणार होती आणि त्यासाठी तो पाकिस्तानात जाणार होता पण तिकडे जाण्याच्या आतच त्याला जेरबंद करण्यात आले.

मुंबई बरोबरच अन्य दोन तीन शहरांवरही त्याने लक्ष केन्द्रित केले होते असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्ये आपल्या निशाण्यावर ठेवली होती. याचा अर्थ असा होतो की दाऊद पाकिस्तानात शांत बसलेला नाही. तो काही तरी करण्याची योजना आखत आहे. सध्या अतिरेकी संघटनांचे मनोधैर्य कमी झाले आहे आणि भारतातून त्यांना एरवी मिळणारी कुमक मिळत नाही. म्हणूनच फाझल मिर्झा सोबत पाकिस्तानातल्या त्याच्या गॉड फादर्सनी भारतात काही तरुणांना नादी लावून त्यांची या संघटनांत भरती करण्याबाबतही चर्चा केली होेती. एकंदरीत गेली चार वर्षे देशांतर्गत कारवायांबाबत दहशतवादी संघटनांनी जे मौन बाळगले आहे ते मौन नसून वादळापूर्वीची शांतता आहे. ते वादळ प्रत्यक्षात आकाराला न येता त्याला येण्यापूर्वीच जिरवण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणांना तयार रहावे लागणार आहे.

Leave a Comment